भारतीय संसदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

मुंबई : २० जुलै – संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फोन टॅपिंगवरुन काँग्रेसनं जोरदार गोंधळ घातला. मोदी सरकारकडून राजकीय मंडळींसह अनेक क्षेत्रातील लोकांचे फोन टॅप केले जात अशल्याचा आरोप करुन खळबळ उडवून दिली. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. भारतीय संसदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न आहे. इतकंच नाही तर एक-दोन मीडिया हाऊसला चायनीज फंडींग होत आहे. ज्याद्वारे बदनामीचा अंजेडा राबवला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय.
संसंदेचं अधिवेशन डिरेल करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून केला जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करुन सर्व जाती धर्माच्या लोकांना पंतप्रधान मोदी यांनी संधी दिली आहे. अशावेळी अधिवेशन डिरेल करण्याच्या उद्देशानं अधिवेशनाचं कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही मीडिया हाऊसेसनी Pagasus च्या बातम्या दाखवल्या, छापल्या. काहींनी एक यादीही दिली. पण त्या बातमीला कोणताही आधार नाही. भारत सरकारची कोणतीही एजन्सी अशा कोणत्याही पद्धतीचं हॅकिंग करत नाही. आपल्याकडे असलेल्या टेलिग्राफ अॅक्टनुसार आपल्याला हवी ती माहिती मिळू शकते. त्यामुळे असं काही करण्याची गरजंच नाही, असं फडणवीसांनी म्हटलंय.
दरम्यान, संबंधित विभागानं अशा बातम्या देणाऱ्यांना नोटीस दिली आहे. लवकरच सत्य काय ते समोर येईल. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातही फोन टॅपिंगचा आरोप झाला होता. तेव्हा उत्तर देताना मनमोहन सिंह यांनी आम्ही नाही तर एका खासगी एजन्सीने फोन चॅपिंग केल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर जे काम झालं आहे ते कायदेशीर झालं असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. लोकसभेत याबाबत माहिती देताना फोन टॅपिंग हे राष्ट्रीय सुरक्षा, टॅक्स चोरी आणि मनी लॉड्रिंग रोखण्यासाठी फोन टॅप झाल्याचं सांगितलं. तसंच ते योग्य असल्याचं समर्थनही केलं होतं. त्याचबरोबर फोन टॅपिंगची बातमी येणं चुकीचं असल्याचं सांगत, याबाबत यापुढे काळजी घेऊ असंही ते म्हणाले होते. युपीए च्या काळात एकदा नाही तर अनेकदा फोन टॅपिंग झालं आणि ते कसं कायदेशीररित्या योग्य आहे हे देखील सांगण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे.
फेगसीस मध्ये ४५ देशांचा उल्लेख आहे. मात्र चर्चा फक्त भारताचीच केली जात आहे. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या हेतूनं हे सगळं केलं जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केलाय. एक-दोन मीडिया हाऊसला चायनिज फंडिग येत आहे. त्याद्वारे एक बदनामीचा अजेंडा राबवला जात आहे. भारताला बदनाम करण्याचं हे एक षडयंत्र आहे. अशा बदनामीचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.
तसंच जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो, तोपर्यंत एनएसओच्या कोणत्याही यंत्रणा आम्ही वापरल्या नाहीत. माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात असं कधीही झालं नाही. काही परदेशी एजन्सी भारताला बदनाम करत आहेत. त्याचाच एक भाग आपण बनू नका, असं आवाहनही फडणवीसांनी यावेळी केलं आहे.

Leave a Reply