निरव मोदींच्या प्रत्यार्पणाला इंग्लंडच्या गृहमंत्रालयाचा हिरवा कंदील


नवी दिल्ली : १६ एप्रिल -पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. इंग्लंडच्या गृहमंत्रालयाने त्याला भारताकडे सोपवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. सीबीआयने याबाबतची माहिती दिली आहे. नीरव मोदी घोटाळा करुन जानेवारी २०१८ ला भारतातून फरार झाला होता.त्यानंतर त्याला मार्चमध्ये लंडन येथे अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो वेस्ट लंडनमधील वाँड्सवर्थ तुरूंगात आहे. भारताने नीरव मोदी फरार झाल्यापासून त्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. हे प्रकरण त्यानंतर न्यायालयात गेले. २५ फेब्रुवारीला ब्रिटनच्या न्यायालयाने नीरव मोदीला भारताकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. आता गृहविभागाने नीरव मोदीला भारताकडे सोपवण्यास मंजुरी दिली आहे.
१४ हजार कोटीच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी मुख्य आरोपी आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. मद्यसम्राट विजय मल्यानंतर मोदी हा दुसरा व्यावसायिक आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आला. न्यायालयाच्या निर्णयानंतर मोदी याच्या देशातील आणि देशाबाहेरील मालमत्ता जप्त करण्याचा मार्गही मोकळा झाला होता.
0000000000000

Leave a Reply