संपादकीय संवाद – वाराणसीचे पोलीस आणि संघाची काळी टोपी

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाराणसी येथे सभा झाली या सभेत नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यातील बहुतेकांनी तोंडाला मास्क लावले होते. वाराणसी पोलिसांनी त्यावेळी ज्या व्यक्तींनी तोंडाला काळे मास्क लावले अश्या व्यक्ती शोधून त्यांना आग्रहाने काळे मास्क काढायला लावले.
याच सभेत अनेक संघाचे स्वयंसेवकाही उपस्थित होते, नरेंद्र मोदी हे संघाचे स्वयंसेवक आणि त्यातही माजी प्रचारक त्यामुळे तिथल्या अनेक संघ स्वयंसेवकांनी संघाचा पूर्ण गणवेश घालून येणे श्रेयस्कर मानले, संघाच्या गणवेशात घोंगड्यापासून बनवलेली काळ्या रंगाची टोपी डोक्यात घालायची असते या स्वयंसेवकांनी तशी टोपिही डोक्यात घातली होती पोलिसांनी ती काळी टोपिही सर्व स्वयंसेवकांना डोक्यातून काढायला लावली.
या संदर्भातील माहिती शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाने आपल्या आजच्या अंकात एका लेखात दिली आहे. त्यांनी पोलिसांच्या या कृतीवर टीकाही केली आहे. मुळात प्रश्न असा येतो की या काळ्या रंगाचे वाराणसीच्या पोलिसांना इतके वावडे का? मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षेचा भाग म्हणून ही काळी टोपी काढायला पोलिसांनी सांगितले मात्र, काळी टोपी आणि काळा मास्क यामुळे सुरक्षेला कोणता धोका होतो? याचे उत्तर अद्यापही आम्हाला मिळालेले नाही. काळ्या टोपीतून काही बॉम्बसदृश्य वस्तू किंवा स्फोटक लपवून नेणे शक्य नाही तसेच काळया मास्कने सुरक्षेला कोणताही धोका होत नाही तरीही ही काळजी का? असा प्रश्न निर्माण होतो. एक शंका अशीही मनात येते की कदाचित काही संघटना किंवा काही व्यक्ती काळे झेंडे दाखवून मोदींचा निषेध करणार असल्याची पोलिसांना कुणकुण लागली असावी म्हणून हा प्रकार असावा. मात्र निषेध करणारे आधी जाहीर करतात, आणि मग निषेध करतात. त्यातही ते काळे झेंडे फडकावतात किंवा काळ्या फिती लावतात प्रसंगी काळे शर्टही घालतात मात्र, त्यावर निषेधाच्या घोषणा लिहिलेल्या असतात.
इथे मास्कवर तसे काहीही लिहिलेले नव्हते मास्क ही सद्यस्थितीची गरज आहे. त्यामुळे मास्क लावले गेले होते. ते काळे आहेत म्हणून पोलिसांनी काढायला लावण्यात कोणता शहाणपणा याचा काहीच बोध होत नाही.
संघाचा विद्यमान गणवेश ठरला तेव्हापासून घोंगड्याची काळी टोपी डोक्यात घालायची हे ठरले आहे, आता काळी टोपी हे काही राज्यांमध्ये पोलिसांच्या गणवेशाचेही एक अंग आहे. त्याचबरोबर लष्करातून कर्नल किंवा त्यावरच्या पदावर पोहोचलेल्या आणि निवृत्त झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ही काळी टोपी एक सन्मान म्हणून वापरायला दिली जाते. अश्यावेळी एखादे निवृत्त मेजर जनरल काळी टोपी घालून मोदींच्या सभेला आले तर त्यांनाही वाराणसीच्या पोलीस टोपी काढायला लावणार का? असा प्रश्न निर्माण होतो.
संघ गणवेशातील काळी टोपी हा अनेक संघ स्वयंसेवकांसाठी श्रद्धेचा भाग आहे. हे स्वयंसेवक फक्त संघ स्थानावरच नाही तर इतरत्रही आदराने काळी टोपीचा वापरतात. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी हे सतत संघाची काळी टोपी डोक्यात घालून असतात. याचा अर्थ त्यांना कुणाचा निषेध करायचा आहे असा घ्यायचा का?
या सर्व पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी थोडा शहाणपणा स्वीकारावा इतकेच सुचवावेसे वाटते. सध्या देशात संघ स्वयंसेवकांचे सरकार आहे अश्यावेळी संघाच्या सरकारचे संघ स्वयंसेवक काळ्या टोप्या घालून विरोध करणार नाहीत ही साधी बाब आहे,त्यामुळे काळी टोपी किंवा काळा मास्क हे सुरक्षेच्या कारणावरून काढायला लावणे हा आमच्या मते तरी पोरकटपणाचं आहे हे उत्तरप्रदेशच्या पोलिसांना समजावून सांगायची गरज आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील संघ स्वयंसेवकांचा आहेत ते वाराणसी पोलिसांना चार समजुतीच्या गोष्टी सांगतील अशी अपेक्षा करूया.

अविनाश पाठक

Leave a Reply