संपादकीय संवाद – पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू होणे चुकीचेच

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्याच्या विरूर पोलीस स्टेशनमध्ये चोरीच्या आरोपावरून पोलीस कोठडीत एका आदिवासी युवकाचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू जरी आजराने झाला असा दावा पोलीस करत असले तरी पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा दावा मृताचे नातेवाईक करीत आहेत. चंद्र्पुर जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनीही हा आरोप केला असून दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच रेल्वे सुरक्षा दलाकडून ही चौकशी काढून सीबीआय चौकशीचीही मागणी त्यांनी केली आहे.
पोलीस कोठडीत आरोपीचा मारहाणीमुळे मृत्यू होण्याची ही काही पहिलीच घटना नाही, किंबहुना अश्या अनेक घासताना आपल्याकडे घडलेल्या ऐकायला मिळतात. गेल्याच आठवड्यात नागपुरातही एका आरोपीला केलेल्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, त्याआधी यवतमाळ जिल्ह्यात पुसदलाही अशी घटना घडली होती. याशिवाय अश्या कितीतरी घटना घडल्याच्या बातम्या वेळोवेळी येत असतात.
मुळात प्रश्न असा येतो की, पोलिसांनी पोलीस कोठडीत आरोपींना मारहाण करणे कितपत योग्य आहे? घटनेनुसार आणि देशातील विद्यमान पोलीस कायद्यानुसार पोलिसांना कोणत्याही संशयित आरोपीला मारहाण करण्याची तरतूद नाही. जोवर आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होत नाही, तोवर पोलिसांना त्याच्यावर कोणतीही शारीरिक दंडेली करता येत नाही. याला अपवाद एकच जर आरोपी आक्रमक होऊन पोलिसांवर हल्ला करत असेल तरच ते स्वसंरक्षणार्थ पाऊल उचलू शकतात. इतकेच काय, पण एखाद्या दंगलसदृश्य परिस्थितीत जमाव आक्रमक झाला आणि सार्वजनिक मालमत्तेला नुकसान पोहोचवत असला तरी पोलिसांना जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय लाठीहल्ला अश्रूधूर किंवा गोळीबार अश्या आयुधांचा वापर करता येत नाही.
तरीही असे मारहाणीचे प्रकार घडतात आणि त्यात अनेकदा निरपराध व्यक्तींचाही मृत्यू होतो मग जनमताच्या रेट्यामागे पोलिसांची चौकशी होते आणि पुराव्याअभावी ते निर्दोष सुटतात पुन्हा असे प्रकार सुरूच राहतात. यावर काहीतरी ठोस उपाययोजना व्हायला हव्यात गुन्ह्याची कबुली सहजासहजी मिळत नाही हे मान्य मात्र त्यासाठी मारहाण हा उपाय नाही त्यावर दुसऱ्या उपाययोजना शोधायला हव्या त्याचबरोबर पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू होऊ नये, यासाठी तपास करणाऱ्या पोलिसांनाही वेगळे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. हंसराज अहिरांसारख्या माजी गृहराज्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने याबाबत विचार करायला हवा इतकेच यावेळी सुचवावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply