राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमबहूल भागांमध्ये शाखा सुरू करणार

चित्रकूट: १3 जुलै- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिमबहूल भागांमध्ये शाखा सुरू करणार आहे . चित्रकूटमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये कोरोना कालावधीत बंद पडलेल्या संघाच्या कार्यक्रमांबरोबरच शाखाही पुन्हा सुरु करणार असल्याची घोषणा करण्यात आली. देशभरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये आपल्या शाखा सुरु करण्याचा निर्णय संघाने घेतला. पश्चिम बंगालमध्ये संघटनेची पाळंमुळं मजबूत करण्यासाठी राज्याची तीन खंडांमध्ये विभागणी करुन काम करण्याचा निर्णयही संघाने चित्रकूटमधील बैठकीत घेतलाय.
केवळ मोठ्या आणि लहान शहरांमध्ये असलेला संघाचा प्रभाव आता गावागावांमध्ये पोहचवण्यासाठी या बैठकीमध्ये रणनिती आखण्यात आली आहे. केवळ हिंदूच नाही तर मुस्लिमांनाही संघाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर देण्यासंदर्भातील धोरणही या चिंतन बैठकमध्ये निश्चित करण्यात आलं आहे.
आरएसएसच्या चिंतन बैठकीमध्ये प्रांत प्रचारकांना त्यांच्या कामाचं स्वरुप समजावून सांगण्याबरोबरच पुढील वर्षभरामध्ये संघाकडून काय कार्यक्रम आखण्यात आले आहेत, याची कल्पना देण्यात आली. संघाने काही महत्वाच्या पदांमध्ये बदल केला आहे, त्याचप्रमाणे आता भैय्याजी जोशी हे संघ आणि विश्व हिंदू परिषदेदरम्यानचे संयोजक असतील. दक्षिण बंगालमधील प्रांत प्रचारक जलधर महतो यांना सह क्षेत्र प्रचारक ही जबाबदारीही देण्यात आलीय, तर प्रांत प्रचारक प्रशांत भट्ट यांना दक्षिण बंगालमधील प्रांत प्रचारक करण्यात आलंय. त्याचप्रमाणे पूर्वेकडील ओडिसा आणि बंगालच्या प्रांतामधील सह क्षेत्र प्रचारक रामापदो पाल यांच्यावरही नवीन जबाबदारी सोपवण्यात आलीय. क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशींना अखिल भारतीय सह संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचं मुख्य कार्यालय चंढीगडमध्ये असेल. तसेच डॉक्टर कृष्ण गोपाल यांना विद्या भारतीचे प्रमुख संपर्क अधिकारी बनवण्यात आलं आहे.

Leave a Reply