खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट बघतोय : राज ठाकरे, मराठा-ओबीसी आरक्षण अडले कुठे?

पुणे:११ जुलै- माझ्यामागे ‘ईडी’ लावली, तर मी सीडी बाहेर काढेन, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. त्यामुळे मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याची वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज रविवारी केले. राज ठाकरे हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते रविवारी मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी ‘ईडी’च्या कारवाईवर तोफ डागत भाजपच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली.
राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असतानाही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे. ईडीसारखी सरकारी यंत्रणा ही सरकारच्या हातातलं बाहुलं झालंय. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली.
भोसरी जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने नुकतीच एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली होती. त्यानंतर ईडीकडून एकनाथ खडसे यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती.
आरक्षणाच्या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण, जर सर्वांनाच मान्य आहे तर अडले कुठंय?, आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून केवळ राजकारण करायचे आहे का?, असा सवालही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी केला.

Leave a Reply