मंत्री उदय सामंत यांच्या पुढेच शिवसेना पदाधिकाऱ्यांची धक्काबुक्की

वर्धा: १० जुलै- शिवसेनेतील स्थानिक दोन गट दिवसेंदिवस आमने सामने येत असताना, राज्याचे उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांच्या पुढेच हिंगणघाटचे सीताराम भुते आणि जिल्हा संपर्क प्रमुख माजी खा. अनंत गुढे यांच्यात धक्काबुक्की झाली. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतील व्हेंटीलेटर वाटप कार्यक्रमासाठी उच्च शिक्षण तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत गुरुवारी वर्ध्यात आले असता, शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांचा गराडा जमा झाला. कार्यकर्ते निवेदनं देत असतानाच हिंगणघाट येथील सीताराम भुतेही निवेदन देण्यासाठी गेले. यावेळी त्यांची शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे यांच्यासोबत धक्काबुक्की झाल्याची जोरदार चर्चा वर्ध्यात रंगली आहे. सीताराम भुते यांनी आपल्याला धक्काबुक्की झाल्याचे सांगितले, तर गुढे यांनी असे काहीच झाले नसल्याचे सांगितले.
वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून शिवसेनेत अंतर्गत धूसफुस सुरू आहे. दरम्यान, हिंगणघाट येथील भाजपाचे ९ आणि १ अपक्ष नगरसेवक फोडण्यात अनंत गुढे यांना यश आले असले, तरी तेथील जुने शिवसैनिक व माजी मंत्री अशोक शिंदे यांना डावल्यात आल्याने जुन्या शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे जिल्हा संपर्कप्रमुख हा जिल्ह्यातलाच असावा अशीही मागणी काहींची होती.

Leave a Reply