जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना स्थगिती हा ओबीसींच्या लढ्याचा विजय : विजय वडेट्टीवार

नागपूर्:१० जुलै-राज्य निवडणूक आयोगाने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन स्थगित केल्याचा आनंद आहे. या निवडणुका स्थगित झाल्याने त्या कोणी स्थगित केल्या, यापेक्षा त्या निवडणुका स्थगित झाल्या हे महत्त्वाचे असून, हा ओबीसींचा लढ्याचा विजय असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. ते नागपुरात त्यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, या निवडणुका स्थगित व्हाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न केले होते. राज्य सरकारने यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनीही स्वतः या प्रकरणात पाठीशी उभे राहून प्रयत्न केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. तर राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले. ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाल्या शिवाय निवडणुका होऊ नये, अशीच भूमिका आम्ही घेतली होती, असेही वडेट्टीवार म्हणाले.
निवडणूक आयोगाला अधिकार दिल्यावर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी पत्र लिहून निवडणुका रद्द कराव्यात असे पत्र निवडणूक आयोगाला दिले. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोनाच्या परिस्थितीचा अहवाल मागवला आणि त्यानंतर कोरोनाच्या परिस्थितीवर निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा ओबीसीच्या लढ्याचा विजय आहे. यामुळे आता मागासवर्ग आयोगाची नेमणूक झाली आहे. येत्या तीन महिन्यात इंपेरिकल डेटा तयार करून तो सादर करून ओबीसीचे आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

Leave a Reply