रपट्यावरील छोटा पूल ओलांडताना नदीच्या पुरात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर : ९ जुलै – नागपुरातील कळमेश्वरसह परिसरात गुरुवारी (८ जुलै) झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील नद्या आणि नाल्यांना पूर आला. यातच कळमेश्वर पाटणसावंगी जाणार्या रस्त्यावर आणि कळमेश्वर शहराला लागूनच असलेल्या गोवरी नदीवरील रपट्यावर असलेला छोटा पूल ओलांडत असताना नदीला आलेल्या पुरात दोघे वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. अण्णाजी पुरुषोत्तम निंबाळकर (वय ५२), प्रवीण ऊर्फ गुड्ड मधुकरराव शिंदे (वय ४२) दोघेही रा. गोवरी, तालुका कळमेश्वर असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत.
वाहून गेलेले दोघेही शेतकरी असल्याची प्राथमिक माहिती असून, गोवरी गावावरून काही कामानिमित्त कळमेश्वरला दुचाकी क्र. एम.एच. ४0/क्यू. १0३३ ने आल्याची माहिती असून, अण्णाजी निंबाळकर यांना दोन मुले तर गुड्डू शिंदे यांना एक मुलगा, एक मुलगी असल्याची माहिती आहे. दोघेही शेतकरी असून, शेती साहित्य खरेदी करण्यासाठी ते कळमेश्वरला आले असल्याची प्राथमिक माहिती आहे. गुरुवारी सकाळपासूनच कळमेश्वरसह परिसरात संततधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदी-नाले ओसंडून वाहत होते. यातच नदीच्या पलीकडे दुचाकी ठेवून दोघांनीही पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने नदीत उतरताच दोघेही वाहून गेले. घटनेची माहिती प्रशासनाला कळताच शोध कार्य सुरू केले. परंतु, उपलब्ध नसलेल्या रेस्क्यू टीमच्या अभावी शोधकार्यात अडचणी निर्माण होत होत्या. माहिती कळताच नागरिकांनी नदीच्या आजूबाजूला एकच गर्दी केली होती. घटनास्थळावर कळमेश्वर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आसिफ रजा शेख, पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नायब तहसीलदार संजय भुजाडे, तलाठी सूरज साजदकर यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. वृत्त लिहिस्तोवर दोघेही मिळाले नाही. घटनेची नोंद कळमेश्वर पोलिसांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे.
कळमेश्वर पाटणसावंगी रस्त्यावर गोवरी नदीचा रप्टा म्हणून या नदीवर एक छोटा पूल आहे. दरवर्षी या नदीवरील पुलावर पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात पूर येतो. नदीच्या पलीकडे गोवरी खैरी, तोंडाखैरी, सिल्लोरी, बेलोरी, पारडी, वलनी, खंडाळा आदी गावे आहेत. या गावातील विद्यार्थी कळमेश्वर शहरात शिक्षणाकरिता दररोज ये-जा करीत असतात. दरवर्षी या पुलावर पावसाळ्यामध्ये मोठा पूर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना जोपयर्ंत पूर ओसरत नाही. तोपयर्ंत नदीकाठावर उभे राहावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून या नदीवर मोठा पूल व्हावा, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांची आणि विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली आहे. परंतु, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा पूल अजूनपर्यंत मोठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे गुरुवारी दोन शेतकर्यांचा नाहक बळी गेला असल्याची खंत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply