टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविना ?

टोकियो: ८ जुलै- जपानची राजधानी टोकियो येथे २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. पण टोकियोमध्ये वाढत्या करोना संकटामुळे जपानी सरकार आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. आता, टोकियोमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या आणीबाणीमुळे प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे.
गेल्या वर्षी करोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. ऑलिम्पिक स्पर्धावरील करोना संकट लक्षात घेता जपान सरकार आणखी काही कठोर निर्णय घेऊ शकते. खेळांच्यादरम्यान परदेशी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळणार नाही. यापूर्वी, टोकियोमधील नागरिकांना मैदानात जाऊन ऑलिम्पिक खेळ पाहणे शक्य आहे का हे तपासले जात होते. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी करोना विषाणूचा वाढत्या कहर लक्षात घेऊन टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आणीबाणीच्या परिस्थितीत ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाईल. त्यामुळे आता ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply