विदर्भात बरसला मुसळधार पाऊस

नागपूर:८ जुलै- जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर आज गुरुवारी पुनरागमन केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भात रात्रभरापासून सुरू असलेल्या हलक्या स्वरूपाच्या पावसाने पहाटे नंतर तीव्र रूप धारण केले. नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, अमरावती जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे.
मागील महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे दमदार आगमन झाले होते. त्यानंतर तब्बल दोन ते तीन आठवडे पावसाने दडी मारली होती. अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असून, यामुळे कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होईल, अशी शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांत पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता आहे.
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळमध्ये शुक्रवारीही चांगल्या पावसाची शक्यता आहे. तर संपूर्ण कोकण, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply