५ जुलै रोजी विदर्भातील शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन

अकोला: ३ जुलै- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मागील २० महिन्यांपासून शासनाकडे ३२ मागण्या केल्या, मात्र, महाविकास आघाडी सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे याविरुध्द ५ जुलै २०२१ रोजी विदर्भातील शिक्षक काळ्या फिती लावून आंदोलन करतील. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष वेणूनाथ कडू, कार्यवाह नरेंद्र वातकर यांनी शासनाचा निषेध म्हणून हे आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
जुनी पेंशन योजना लागू करुन भविष्य निर्वाह निधी योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, ७व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला व दुसरा हफ्ता तात्काळ देण्यात यावा, शिक्षकेत्तरांची पदे भरतीबाबतचा निर्णय रद्द करुन पूर्वीप्रमाणे भरती करण्यात यावी, कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विशेष रजा मंजूर करणे, कोरोनामुळे मृत कर्मचार्‍यांच्या वारसदारांना अनुकंपा योजना लागू करावी आदी प्रलंबित मागण्या शासनाने तात्काळ मान्य कराव्या, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे अमरावती विभागाचे राजकुमार बोनकिले, अमोल काटेकर आदींनी कळविले.
कोविडच्या पार्श्‍वभूमीवर शिक्षक परिषदेने तीव्र आंदोलन टाळले असून, शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षक परिषद कार्यकारिणीने घेतला आहे.शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शासनाला वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन दिले.

Leave a Reply