ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले हे राज्यपालांना माहित असायला हवे – नवाब मलिक

मुंबई : १ जुलै – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी मुख्यमंत्र्यांचं ओबीसी आरक्षणाकडे लक्ष वेधलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. ओबीसी आरक्षण राज्याने रद्द केलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं आहे. त्यामुळे ही परिस्थिती उद्बवली आहे, असा टोला नवाब मलिक यांनी राज्यपालांना लगावला आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत राज्यपालांनी पत्रात उल्लेख केला आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षण रद्द केलं आहे. कोर्टाच्या आदेशावरून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्याच्या निर्णयामुळे नाही हे राज्यपालांना माहीत असायला हवे होते, असा टोलाही मलिक यांनी लगावला आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणाबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि निर्णय याबाबत राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही, अशा शब्दात मलिक यांनी राज्यपालांच्या पत्रावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र राजकीय उद्देश ठेवून लिहिल्याचा आरोपही त्यांनी केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून त्यांचं ओबीसी आरक्षणासह इतर गोष्टींवर लक्षं वेधलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं शिष्टमंडळ 23 जून रोजी मला भेटलं. त्यांनी दोन निवेदने मला दिली आहेत. त्यामध्ये त्यांनी विधानसभा अधिवेशनाचा कालावधी वाढवणे, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि ओबीसी आरक्षण प्रलंबित असल्याने जिल्हा परिषद निवडणुका स्थगित करा, या मागण्या केल्या आहेत. हे तीनही विषय महत्त्वाचे आहेत. त्यावर योग्य कारवाई करुन, याबाबत मला कळवा, असं राज्यपालांनी या पत्रात म्हटलं होतं.
दरम्यान, राज्यपालांच्या या पत्रावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज्यपालांना आम्हाला स्मरण करून द्यायची गरज काय? आम्हीही त्यांना 12 आमदारांच्या यादीचे स्मरण करून देत आहोत. यादी तुमच्याकडे पडली आहे त्या वर सही करा. त्याचे विस्मरण का होतेय हे लक्षात येत नाही ? बाकी सगळं स्मरणात येते यादीचे मात्र विस्मरण होते, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे.

Leave a Reply