अज्ञात दरोडेखोरांनी १० लाखाचे सोने लुटले

नागपूर : १ जुलै – दुध विकून व्यवसाय करणाऱ्या एका कुटुंबीयांच्या घरावर अज्ञात गुन्हेगारांनी दरोडा टाकून सुमारे १० लाखांचे सोने लुटले. अशी ही थरारक घटना हिंगणा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धामना पेठ गावात पहाटे घडली. मोरेश्वर डवरे आणि त्यांचे कुटुंबीय धामना पेठ गावातील शेतात राहतात. त्यांचा दूध विक्रीचा पिढीजात व्यवसाय आहे. काल त्यांनी व्यवसायाची सर्व कामे केली आणि संपूर्ण कुटुंबीय झोपी गेले. त्यांच्याकडे सुरक्षेसाठी तीन मोठे श्वानही त्यांनी ठेवले होते. यामुळे डवरे कुटुंबीय निर्धास्तपणे झोपले.
हीच संधी साधत अज्ञात चोरांच्या टोळीने घरामागचा दरवाजा दबाव टाकून तोडला. भिंतीच्या आतील ग्रील तोडून आत प्रवेश केला. आत गेल्यावर चोरांना कपाट नेमके कुठे ठेवले आहे, याची माहिती होती. त्यानुसार त्यांनी कपाटातील १४ ते २० तोळे सोने आणि रोख २२ हजार रुपये लुटून नेले.
दुध विक्रीचा व्यवसाय असल्याने डवरे कुटुंबातील काही सदस्य पहाटे ३.३० लाच उठतात. पण घटना घडली त्याच दिवशी ते सर्व जण चक्क ६ वाजेपर्यंत झोपूनच होते. जेव्हा कुटुंबातील महिला उठल्या तेव्हा त्यांना काही तरी चुकीचे घडल्याचा भास झाला. प्रत्यक्षात त्यांनी कपाट पाहिले असता चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. हिंगणा पोलिसांना सकाळी चोरीची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ मोरेश्वर डवरे यांच्या शेतातील घर गाठले. पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे, सहायक पोलिस निरीक्षक भातुकले, तोडासे यांनी परिसराची पाहणी केली. चोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले होते. इतरही सर्व आयुधांचा वापर या चोरीचा छडा लावण्यासाठी केला जात आहे.
धामना पेठ परिसरातील शेतात राहणाऱ्या मोरेश्वर डवरे यांच्या घरी चोरीची घटना पूर्वनियोजित कट होता. कारण गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्याकडे पाळलेली तीन कुत्रे बेपत्ता होती. जेव्हा त्या कुत्र्यांचा शोध घेतला असता त्यातील एका कुत्र्याचा मृतदेह आढळून आला. याचा अर्थ चोरांच्या टोळीने संपूर्ण कुटुंबीयांचा अभ्यास करून हा दरोडा टाकला असावा, अशी शंका उपस्थित झाली आहे. दुधाचा मोठा व्यवसाय असल्याने दहा ते बारा जण शेतात राहायचे. याचा अर्थ एक दोन गुन्हेगारांचे हे काम नाही. नक्कीच आरोपींची संख्याही अधिक असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply