विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच, याच अधिवेशनात निवडला जाणार – बाळासाहेब थोरात

मुंबई : ३० जून – विधानसभा अध्यक्षांची निवड या अधिवेशनात होणार की नाही याबाबतची उत्सुकता असताना, आता काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोंडी फोडली आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल, असं थोरातांनी सांगितलं. येत्या पाच आणि सहा जुलैला विधानसभेचं पावसाळी अधिवेशन होत आहे.
नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. मात्र विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात होणार आहे आणि तो अध्यक्ष काँग्रेसचा असेल. हे सरकार भक्कम आहे. दोन वर्षे सरकार चाललं आहे, पुढच्या काळातही सरकार चांगल्या पद्धतीने चालेल, महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत”
शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांना पक्षात बंद करण्याची गरज नाही. ते महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत. त्यांना भेटणे गैर काही नाही, असं थोरात म्हणाले. तर महामंडळाचे वाटप लवकरच होईल. सर्व कार्यकर्त्यांना त्यातून संधी मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
केंद्राच्या कृषी कायद्यांनी शेतकर्यांनना फटका बसणार आहे. त्यामुळे नवीन कृषी कायदा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. या अधिवेशनात तो कायदा येईलच, त्यासाठी आम्ही सर्व घटकांशी बोलत आहोत. शेतकऱ्यांच्या हिताचा हा कायदा असेल, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

Leave a Reply