नवऱ्याने बायकोचा गळा चिरून केले जखमी

नागपूर : ३० जून – १५ दिवसांपासून माहेरी राहात असलेल्या पत्नीला घरी चालण्यास गळ घालणाऱ्या नवऱ्याने तिने घरी येण्यास नकार देताच तिचा गळा चिरून तिला जखमी केल्याची घटना इमामवाडा हद्दीत उंटखाना मैदान अजंता हॉलजवळ दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास घडली. पत्नीला रक्ताच्या थारोळयात लोळवून पती पसार झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार, उंटखाना मैदानाजवळ राहणार्याय युवतीने निखिल दमके याच्याशी २ वर्षांआधी मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर ते दोघेही मानेवाडा परिसरात एका भाड्याच्या खोलीत राहायचे. निखिल पानठेल्यावर खर्रा घोटण्याचे काम करायचा तर त्याची पत्नी एका हॉस्पिटलमध्ये काम करायची. काही दिवसांपासून निखिलने काम करणे बंद केले होते. त्यानंतर त्यांच्यात भांडण व्हायला लागले. या भांडणांना कंटाळून त्याची पत्नी १५ दिवसांआधी तिच्या माहेरी उंटखाना मैदानजवळ राहायला आली. दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास निखिलने तिला बोलण्यासाठी मैदानाजवळ बोलाविले. ती त्याला भेटायला गेली असता, त्याने तिला घरी परत चलण्याचा आग्रह केला. पण तिने नकार दिल्याने त्यांच्यात जोरदार भांडण झाले. भांडणादरम्यान त्याने धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केले. यामुळे ती खाली कोसळली. तिला रक्ताच्या थारोळयात सोडून निखिल फरार झाला. परिसरातील लोकांनी युवतीला मेडिकल हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती केले. याप्रकरणी मिळालेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply