जालन्यात मराठा आंदोलकांनी अडवला जयंत पाटील आणि धनंजय मुंडेंचा ताफा

जालना : २९ जून – जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा ताफा मराठा आंदोलकांनी अडवला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संभाजी ब्रिगेड आणि मराठा आंदोलकांनी दोन्ही मंत्र्यांचा ताफा अडवला. यावेळी एक मराठा लाख मराठा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणादून सोडला होता.
राष्ट्रवादी काँग्रसने राज्यात परिसंवाद रॅली काढली आहे. औंढा नागनाथवरुन ही रॅली वसमतच्या दिशेने जात होती. बोराळ पाटी दरम्यान जवळपास 30 ते 35 कार्यकर्त्यांनी मंत्रीमहोदयांचा ताफा अडवला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आरक्षण मिळालंच पाहिजे, एक मराठा लाख मराठा’, अशा घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी आंदोलकांचं आक्रमक रुप पाहता गाडीतून मंत्री जयंत पाटील खाली उतरले आणि आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसंच त्यांच्याकडून निवेदन देखील स्वीकारुन त्यांना आरक्षणप्रश्नी निर्णय घेतला जाईन, असं आश्वस्त केलं. पाटील याच्या बरोबर यावेळी धनंजय मुंडे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर देखील होत्या. त्यांनीही आंदोलकांनी दिलेलं निवेदन स्वीकारलं.
डेल्टा प्लस व्हेरियंटचे राज्यात रुग्ण वाढत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेली परिवार संवाद यात्रा आजपासून स्थगित करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे आमदार राजू नवघरे यांनी आयोजित केलेल्या परिवार संवाद यात्रेला धावती भेट देऊन ही यात्रा स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जेव्हा कोव्हिडचे प्रतिबंध कमी होतील तेव्हा परभणी जिल्हापासून पुन्हा यात्रा सुरू केली जाईल, असं जयंत पाटील म्हणाले.

Leave a Reply