समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यासाठी मुंबई महापालिकेचा इस्रायलच्या कंपनीशी करार

मुंबई : २९ जून – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नि:क्षारीकरण प्रकल्प उभारण्यासाठी प्रकल्प अहवालासाठी मुंबई महापालिका आणि इस्त्रायलच्या कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानंतर इस्रायलच्या दुतावासाने खास मराठीत ट्विट करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. इस्त्रायलने कमी पाण्यात कृषी विकास करण्यासाठी केलेले तंत्रज्ञान मुंबईकरांसाठीही वरदान ठरणार आहे.
मनोर येथे समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी गोडे करणाऱ्या नि:क्षारीकरण प्रकल्प मुंबईतील वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी इस्रायली कंपनीने मुंबई महापालिकेकडे समुद्रातील खारे पाणी गोडे करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रकल्पाला सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. अखेर मुंबई महापालिका आणि इस्त्रायलच्या कंपनीमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाची पुढची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबर २०२०मध्ये दिले होते. सौर ऊर्जेवर हा प्रकल्प राबविल्यास निर्मिती खर्चही कमी लागणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पावसाळ्याच्या सुरुवातीला सातत्याने पाऊस उशिरा येत असल्याने मे व जून महिन्यामध्ये मुंबईत १० ते १५ टक्के पाणी कपात करावी लागते. हे टाळण्यासाठी समुद्रातील खारे पाणी गोडे केल्यास मुंबईतील नागरिकांना पाणी कपातीचा होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. जगात अनेक देशांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. तर काही देशांमध्ये अशा प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. मुंबईसारख्या महानगरात हा प्रकल्प नक्कीच लाभदायक ठरणार असल्याने प्रकल्पासाठी करण्यात येणारी कार्यवाही पुढे सुरू ठेवण्याचे त्यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये म्हटले होते.

Leave a Reply