दिवस झाला छोटा, कोरोना झाला मोठा…!

‘चारच्या आत घरात’ हा नवीन ‘को’रोना निर्बंध कालपासून राज्यभर सुरू झाला. त्यामुळे आता दिवस छोटा झाला आहे. काय दिवस आले मेले, सायंकाळी साडेसहाच्या ठोक्याला मावळणारा दिवस आता चार वाजता मावळणार. राज्यात आजवर विजेचा लपंडाव लोकांनी अनुभवला आता हा दैनंदिन व्यवहार चालू बंद होणारा लपंडाव नव्या विषाणूच्या जुन्या कोरोनापायी अनुभवास येत आहे. हा कोरोना आपणास सोडावयास तयार आहे काय हा मुख्यमंत्री महोदयांनी केलेला ‘तो’ प्रश्न पुन्हा आठवू लागला आहे. भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसऱ्या लाटेइतकी तीव्र नसणार, हे गोड शब्दहि ऐकावयास मिळत आहे. हा कोरोना की मरोना (मरीन स्ट्रेट ड्राईव्ह) भारतीयांना छान इंग्रजीत डेल्टा, डेल्टा प्लस, व्हेरी व्हेरीयंट शिकवू लागला आहे – जसा नवीन पोपट हा लागला लॉकडाऊन-लॉकडाऊन बोलायला… गेली तीन महिने दैनंदिन कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या गरजू लोकांना या रोजच्या लॉकडाऊनमुळे – ‘तू बंद बंद तू बंद बंद’ कॉलर ट्यून ने बेजार केले होते ती आताहि हात धुवून पाठीमागे लागणार, हे पक्के. मान न मान – मैं तेरा मेहमान म्हणून कोरोना बोकांडी बसला आहे. जुन्या काळी चित्रपट सुरू होण्या आधी एखादा ट्रेलर दाखवायचे. तसा ट्रेलर यंदा पावसाने दाखवला पण पावसाळा हा पिक्चर काही सुरू केला नाही. पूर्वी सहा आठवडे रेकॉर्ड ब्रेक टॉकीज मधून चालणारे चित्रपट आठवतात. आता ह्या कोरोनाचा रेकॉर्डब्रेक दिड वर्षापासून ‘शो’ चालू आहे. बोअर झाला तरी बंद पडत नाही. तो बंद पडावा यासाठी आमची भोंगळी चिमुकली पोरं एखादी धोंडी काढण्याच्या विचारात आहेत. त्यासाठी संचारबंदी वा निर्बंध लागू नयेत म्हणजे झाले. तसं मायबाप सरकार भरदुपारी चार वाजताच कडक निर्बंध सुरू करून जनतेच्या महारोग्याची काळजी वहन करण्यास पुनश्च कटिबद्ध झाले आहेच. ‘पैसा झाला खोटा – पाऊस आला मोठा’ ही म्हण आहे पण, पाऊस गेला कुण्या गावा म्हणण्याची वेळ आली आहे. आता कोरोना केव्हा खोटा होतो याची वाट आहे…


– माधव पाटील, पुसद

Leave a Reply