ईडीच्या कारवाईविरुद्ध नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

नागपूर : २५ जून – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरांवर आज सकाळी सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) छापे टाकले आहेत. या कारवाईमुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीने देशमुखांच्या संबंधित ५ ठिकाणी छापे टाकले असून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून नागपूरमध्ये आंदोलन करण्यात आलं आहे.
अनिल देशमुखांवर झालेल्या कारवाईमध्ये भाजपचा हात असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात आंदोलन केलं. यावेळी भाजपविरोधी घोषणा देण्यात आल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने सकाळी धाड टाकली. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस आणि सीआरपीएफचा मोठा छापा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र आंदोलनानंतर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच मुंबईहून ईडीचे पथक नागपुरात पोहोचले. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थान तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापे टाकले. यावेळी पोलिसांचा प्रचंड ताफा ईडी अधिकाऱ्यांसोबत होता. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापे टाकले होते. या छाप्यानंतर लवकरच देशमुख यांच्याकडेही ईडीचे अधिकारी झाडाझडती घेण्याची शक्यता बळावली होती. त्या अनुषंगानेच ही कारवाई आहे.
१०० कोटींच्या मागणीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकाता येथे दोन बनावट कंपनीचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. त्यानंतर या प्रकरणात ईडी सक्रिय झाली. ईडीने गुन्हा दाखल केला. २५ मे रोजी ईडीच्या तीन पथकांनी अंबाझरीतील शिवाजीनगरमधील हरे कृष्ण अपार्टमेंट येथील सागर भटेवारा, सदरमधील न्यू कॉलनीतील समीत आयझॅक व गिट्टीखदानच्या जाफरनगरमधील कादरी बंधूंकडे छापे टाकले. तिघेही देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत.

Leave a Reply