पश्चिम आकाशात दिसणार मंगळाच्या पिधान युतीची दुर्मिळ घटना

नागपूर : १५ एप्रिल – येत्या शनिवार, 17 एप्रिल रोजी तथा मराठी नववर्षाच्या सुरूवातीलाच पश्चिम आकाशात मंगळाच्या पिधान युतीची दुर्मिळ घटना पहावयास मिळणार आहे. चंद्र पृथ्वीला जवळ असल्यामुळे त्याचा द़ृश्य आकार आपल्याला नेहमीच फार मोठा दिसतो. त्यामुळे त्याचा भ्रमणमार्गसुद्धा अधिक रूंद आहे. परिणामत: त्याच्या प्रवासात चंद्र, अनेक ग्रह व तार्यांना आच्छादित करून जात असतो. त्यामुळे काही कालावधीसाठी तो ग्रह किंवा तारा चंद्रामागे अद़ृश्य होतो. या घटनेला पिधान युती असे म्हणतात. अशीच एक घटना 17 रोजी आकाशात पहावयास मिळणार आहे.

येत्या शनिवारी सायंकाळी 5 वाजून 42 मिनिटानी पंचमीचा चंद्र अंधार्या बाजूकडून मंगळ ग्रहाला झाकून टाकेल व नंतर 7 वाजून 42 मिनिटांनी मंगळ ग्रह चंद्रबिंबाच्या बाहेर येईल. म्हणजेच तब्बल दोन तास मंगळ ग्रह चंद्रबिंबाच्या मागे दडून राहील. सायंकाही 5.42 ला बराच सूर्यप्रकाश असल्याने पिधान युतीची सुरूवात पाहता येणार नाही. मात्र 7 वाजून 42 मिनिटाने मंगळ ग्रह चंद्रबिंबाच्या बाहेर येतांनाचे द़ृश्य दिसेल. यात निरीक्षकाच्या स्थळानुसार वेळेत थोडाफार बदल होईल. सध्या मंगळ ग्रह वृषभ राशीत असून पृथ्वीपासून खूप दूर आहे. त्यामुळे मंगळाचे बिंब खूप लहान दिसते. त्यामुळे ज्या भागात प्रकाशाचे प्रदूषण आहे, अशा भागातून यासाठी दुर्बीण वापरावी लागेल. तथा त्याबाजूला आकाशात ढग असल्यासही हे द़ृश्य पाहता येणार नाही. पिधान युतीची ही घटना आशिया खंडातील काही भागातूनच दिसणार आहे. नागरिकांनी या खगोलीय घटनेचे निरीक्षण करावे, असे आवाहन मराठी विज्ञान परिषद अमरावतीचे खगोलशास्त्र शाखा प्रमुख रवींद्र खराबे व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.

Leave a Reply