१४ दिवसांचे अधिवेशन झाले तर आपल्या तेरवीचा कार्यक्रम होईल अशी सरकारला भीती – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : २२ जून – कोरोना प्रादुर्भावाचं कारण देत महाविकास आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजप नेत्यांनी जोरदार विरोध केलाय. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, सरकारच्या निर्णयामुळे नाराज झालेल्या विरोधकांनी सभात्याग केला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी १४ दिवसाचं अधिवेशन झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकतो अशी ठाकरे सरकारला भीती वाटत असल्याची घणाघाती टीका केलीय.
‘ठाकरे सरकारला भीती वाटतेय.१४ दिवसाचं अधिवेशन झालं तर हायड्रोजन बॉम्बसारखा स्फोट झाला. ज्या सचिन वाझेची विना फी ची वकिली करत होते. तो सचिन वाझेच यांच्यावर उलटला. त्यामुळे त्यांना असं वाटतं की अधिवेशन जर 14 दिवसाचं झालं तर आपल्या तेरवीचा आणि गंगापूजनाचा कार्यक्रम होऊ शकते’, असा जोरदार टोला मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला लगावलाय. तर नाना पटोले हे स्वबळाची भाषा करत आहेत, दुसरीकडे अद्याप विधानसभा अध्यक्षांनी निवड झाली नाही, याबाबत विचारलं असता, ‘या तिन पक्षांमध्ये नाराजी होऊच शकत नाही. कारण, एकदा सत्तेची चटक लागली की नाराजी दोन दिवसांपुरती उरते. 19 तारखेला काँग्रेस नेते राहुल गांधींचा वाढदिवस होता, त्या दिवशी केक खाऊ घालायचे, त्याच दिवशी जोडे खाऊ घालायची भाषा झाली. मी याकडे लक्ष देत नाही. या तीन पक्षांमध्ये कोण नाराज आहे याकडे आम्ही पाहत नाही तर जनता नाराज राहता कामा नये ही आमची भूमिका आहे, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकावर टीकास्त्र डागलंय.

Leave a Reply