सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

एक अँडव्हांस – चुकलेला

आज सकाळी सकाळी ऑफिस मध्ये आमचा ऑफिस अँडमिन “सुलेमान”ऑफिस ला थडकला आणि माझी वाट बघत ऑफिस ला बसला होता.
सुलेमान – माझ्यावर जीव ओवाळून टाकणारा अँडमिन. कंपनीने माझ्या सुरक्षिततेची जबाबदारी त्याच्या वर सोपवलेली आणि माझ्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण पणे झटणारा , माझ्या खास विश्वासातला एक.
जातीने मुसलमान. नायजेरियात मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण झाल्यावर, स्थानीय संस्कृती चा -हास झाला आणि दोन धर्म, प्रामुख्याने मुसलमान आणि ख्रिश्चन अस्तित्वात आहेत. सुलेमान चे सासर संपूर्ण ख्रिश्चन मंडळी.
२०१३-२०१४ बोको-हराम आतंकवाद प्रामुख्याने जोरावर होता. रोज नवनवीन बातम्या येत होत्या की आतंकवाद्यांनी आज इतक्या लोकांना कंठस्नान घातले. आज एका गावात शिरून रात्री संपूर्ण गाव उध्वस्त करून सगळ्या गावक-यांना मारुन टाकले वगैरे वगैरे……
नायजेरियात निवडणुका जवळ आल्या की, बोकोहराम चा हमखास उपयोगी निवडणुकांचे वेळी केल्या जातो आणि नंतर ही आतंकवादी संघटना काही काळासाठी अस्तंगत होते.
आज मी ऑफिस ला पोचलो तर पठ्ठा सरळ माझ्या केबिनमध्ये बसुन माझी वाट पहात होता. मला बघताच त्याने गुड मॉर्निंग वगैरे केले. आतंकवादी घटनांचा सध्या चाललेली गतिविधी. आपल्या कार्य क्षेत्रात सध्या तरी काही अडथळा नाही, ही सगळी माहिती त्याच्या बोटावर. आणि निघता निघता त्याने एक अर्ज माझे हातात दिला, मथळा समजावून सांगितला की आजकाल शाळेच्या मुलांना घरून शाळेत जाणे आणि शाळेतून घरी येणे – ही मुलांची ये – जा थांबविली पाहिजे, सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना शाळेच्या होस्टेलमध्ये ठेवणे अत्यावश्यक आहे आणि त्यासंदर्भात त्याला त्याचे तीन ही ख्रिश्चन साळ्यांना शासकीय शाळेच्या होस्टेलमध्ये ठेवायचे होते आणि त्याला त्यासाठी दीड लाख नायरा(नायजेरियन चलन) भरण्यासाठी, अॅडव्हान्स हवा होता. मी त्याला दोन तीन दा नीट विचारपूर्वक निर्णय घे असे सांगून तीन दिवस दिले. म्हटले तीन दिवसांनी मला पक्का निर्णय कळव आणि त्याआधी घर ते शाळा अंतर आणि कसे जातात ही माहिती कळव म्हणून सांगितले.
संपूर्ण माहिती दुस-या दिवशी त्याने कळवली अंतर १२ किमी, पोर बसने किंवा त्यांचे वडील सोडून देतात वगैरे वगैरे.. प्राप्त परिस्थितीत त्याचे बरोबर होते. मला ही पटले आणि त्याच्या तीन ही ख्रिश्चन साळ्यांना होस्टेलमध्ये भरती करण्यासाठी त्याला हवी ती रक्कम अकाउंट सेक्शन ला सांगुन अगाऊ खात्यात मांडून, त्याला देवु केली.
दिवसेंदिवस बोकोहराम चे हल्ले नि: शस्त्र नागरिकांवर होत होते. आमच्या कंपनीला सुद्धा दिवसातून दोन दा भारतात अहवाल भारतात द्यावा लागायचा – “आॅल इज वेल.”
मला ही सगळ्या स्टाफच्या सुरक्षिततेची चिंता लागून गेलेली. दरम्यान सुलेमान ने साळ्यांना होस्टेलमध्ये भरती केल्याची रसीद अकाउंट सेक्शन ला सादर करून, आपल्याला कंपनी ने केलेल्या मदतीबद्दल एक धन्यवाद प्रद पत्र पाठवून, अॅडमिन कसा असावा? याचा नमुना सगळ्यांना दाखवून दिला. आणि साळ्यांना होस्टेलमध्ये भरती केले, त्यामुळे एक मोठ्या, रोजच्या संकटातून सुटका झाल्याच्या आनंदात होता.

कामे आपापल्या परीने नायजेरिया च्या गतीने (हळूहळू) सरकत होती.
एक दिवस सकाळी सुलेमान, रडत रडत आॅफिस च्या केबिनमध्ये आला आणि चिडून म्हणाला,” ओगा! (साहेब) तुम्ही का बरं मला अॅडव्हान्स दिला? माझं का बरं ऐकलं?” चिडून रडत रडत सुलेमान, डोळे पुसंत् पुसंत् मला माझीच् शिकायत लावली. मी संदर्भहीन.
त्याला शांत बसवला एक पाण्याचा ग्लास दिला, म्हटले आता सांग. तो सांगु लागला, “ओगा, काल बोकोहराम च्या आतंकवाद्यांनी शासकीय ख्रिश्चन होस्टेलवर आत घुसुन, खोल्या खोल्यात शिरून ख्रिश्चन होस्टेलर्स वर अमानुष पणे गोळीबार केला, ५९ प्रेतांची ओळख झाली आणि त्यात माझे तीनही साळे आहेत. मला फ्युनरल साठी सुटी दे ओगा… असे म्हणून एक सुटीचा अर्ज टेबलावर ठेवला आणि दोन क्षणात दिसेनासा झाला.

भाई देवघरे

Leave a Reply