खा. संभाजीराजेंनी सक्रिय राजकारणात यावे – प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मुंबई : १७ जून – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा खासदार संभाजी छत्रपती यांना सक्रिय राजकारणात येण्याचं आवतन दिलं आहे. संभाजीराजेंनी सक्रिय राजकारणात यावं. राज सत्तेशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजे यांनी सक्रिय राजकारणात यावं. त्याशिवाय हा मुद्दा निकाली निघणार नाही. राज सत्तेत आल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न निकाली निघणे शक्य नाही. आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्यांना सोबत घ्यावे. आम्हीही तुमच्यासोबत येऊ, असं आंबेडकर म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वंचित आघाडीसोबत आघाडी करण्यात येणार असून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरही आंबेडकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले वंचितला सोबत घेण्याबद्दल बोलत आहेत. पण हे त्यांच्या दिल्लीतील नेत्यांना मान्य आहे का?; त्यांनी 500 कोटींचा आरोप लोकसभेत केला, आता 500 कोटींमधील 100 कोटी आधी आम्हाला द्यावे. आम्हाला तेवढेच पुरेसे आहेत, असं सांगतानाच आम्हाला महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांचा अनुभव चांगला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आंबेडकरांच्या मनात नक्की चाललंय काय याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अयोध्येतील राम मंदिराच्या भूखंडाच्या घोटाळ्यावरही त्यांनी भाष्य केलं. राम मंदिराच्या जमीन घोटाळ्याची चौकशी व्हावी. त्याचसोबत यापूर्वी देखील लोकांनी ज्या सोन्या-चांदीच्या मूर्ती दिल्या होत्या, त्याच काय झालं? याची ही चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. शिवसेनेने जमिनीसोबत पूर्वीच्या देणग्यांचे काय झाले हे ही भाजपला विचारावे, असंही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीबाबत गंभीर असल्याचं सांगितलं. तसेच महापालिका निवडणुकीसाठी व्युवहरचना आखण्यास सुरुवात करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकांमध्ये वंचित कुणाला भारी पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply