ईडीने काल केली तीन व्यावसायिकांची चौकशी, १०० कोटी खंडणीचे प्रकरण

नागपूर : १७ जून – १०० कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा कायम आहे. देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या आणखी तीन जणांची अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने नागपूरमध्ये रात्री उशिरा गुप्त चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईहून ईडीचे पथक नागपूरमध्ये दाखल झाले होते. या पथकाने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या तीन जणांची रात्री उशिरापर्यंत गुप्त चौकशी केली. कोळसा व्यावसायिक धरमपाल अग्रवाल, सीए सुधीर बाहेती आणि सीए भाविक पंजवाणी या तिघांचा यात समावेश आहे. या तिघांकडून काही महत्वपूर्ण कागद पत्र ईडीच्या पथकांनी सोबत नेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१०० कोटी वसुली प्रकरणात या आधी २५ मे देखील ईडीने सागर भटेवार, समित आयझॅक व जोहर कादरी या अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांची चौकशी केली होती.
सागर भटेवार हे अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती समोर आली. गेल्या काही दिवसांपासून भटेवार हे अनिल देशमुख यांच्या संपर्कात होते, त्यामुळेच ईडीने भटेवार यांच्यावर घरावर छापा टाकला होता.
याआधी अनिल देशमुख यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीबीआयने गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दिल्लीत दाखल करण्यात आला असून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहे. आता या प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्यावर एफआयआर दाखल केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात प्राथमिक तपास करून त्या तपासाच्या आधारावर ती अनिल देशमुख यांच्यावर 21 एप्रिल या दिवशी दुपारी 4 वाजता सीबीआयच्या दिल्ली येथील पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. या एफआयआरच्या अनुषंगाने सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते.

Leave a Reply