संपादकीय संवाद – शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीत एकत्र आल्यास बाळासाहेबांवर प्रेम करणारे मतदारच चमत्कार घडवतील

भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवून महाराष्ट्रात चमत्कार घडवतील अश्या आशयाचे विधान शिवसेनेतील उद्धवपंत ठाकरेंचे हीज मास्टर्स व्हाईस म्हणून ओळखले जाणारे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केले असल्याचे वृत्त कानावर आले आहे. सध्या काँग्रेसचे नेते स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करीत आहेत त्यावर टीका करतांना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले आहे. महाआघाडीतील घटकपक्ष असलेले शिवसेना आणि राष्ट्रवादी हे कधीही स्वबळाची भाषा करत नाहीत, मात्र काँग्रेस वारंवार स्वबळाची भाषा करते आहे यावर त्यांनी टीका केली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन खरा चमत्कार तर २०१९ मध्येच घडवला आहे. ज्या काँग्रेस पक्षाला बाळासाहेब ठाकर्यांनी कायम शिव्या घातल्या आणि ज्या शरद पवारांना जाहीर व्यासपीठावरून बारामतीचा ममद्या आणि मैद्याचं पोत अशी शेलकी विशेषणे लावत बाळासाहेबांनी लावली त्या शरद पवारांचे पाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवपंत ठाकरेंनी सत्ता मिळावी म्हणून धरले. आणि फक्त मुख्यमंत्रीपद मिळावे म्हणून तत्वशून्य आघाडी केली. त्याच दिवशी चमत्कार व्हायला सुरुवात झाली. शिवसेना ही कट्टर हिंदुत्ववादी तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कथित सेक्युलर विचारसरणीचा त्या मुद्द्यावर बाळासाहेब आणि शरद पवारांचे कधीही पटले नाही. त्यांच्याशीच लांगुलचालन करून शिवसेनेने सत्ता पदरात पाडून घेतली. आता ती सत्ता टिकवण्यासाठी काय काय करावे लागते आहे हे उभा महाराष्ट्र बघतो आहे. त्यामुळेच मग कधीतरी रस्त्यावर नमाज पढण्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेला आता अजानच्या स्पर्धा घ्याव्या लागत आहेत. उड्डाणपुलाला मुस्लिम मौलवीचे नाव द्यावे लागत आहे. आणि हाजीअली दर्ग्यावर विशेष तरतूद करावी लागते आहे. या सर्व प्रकारामुळे बाळासाहेबांना चाहणारा सच्चा शिवसैनिक मनातून दुखावला असणार हे निश्चित आहे.
ज्यामुळे ज्या पवारांना बाळासाहेबांनी आयुष्यभर जागा दाखवली त्यांची हाजी हाजी करून सत्ता टिकवणाऱ्या आणि तीच सत्ता पुढे टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेनेने अभद्र शय्यासोबत केली तर चमत्कार निश्चित घडेल मात्र तो चमत्कार बाळासाहेबांवर प्रेम करणारे हिंदुत्ववादी मतदार करून दाखवतील याची जणी संजय राऊत यांनी ठेवायला हवी.

अविनाश पाठक

Leave a Reply