कुत्र्याच्या पिलाला गच्चीवरून फेकले, व्हिडीओ व्हायरल

नागपूर : १६ जून – महाराष्ट्राला भूतदयेची एक चांगली परंपरा लाभली आहे. संत गाडगेबाबा यांच्यापासून ते अनेक संतांनी आणि महापुरुषांनी वृक्ष, प्राण्यांवर प्रेम करण्याचं आवाहन आपल्याला केलं आहे. अनेकांनी प्राणी मात्रांसाठी काम केलं आहे. मात्र, याच महाराष्ट्रात एका विकृताने चक्क कुत्र्याच्या पिल्याला गच्चीवरुन फेकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही नागपुरात घडली आहे. या प्रकरणी प्राणी प्रेमींनी आरोपी विरोधात रोष व्यक्त केला आहे
नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्नेह नगर परिसरार राहणाऱ्या एका इसमाने चार दिवसांपूर्वी घरी आणलेल्या कुत्र्याच्या पिल्याला चक्क घराच्या गच्चीवरून खाली फेकल्याची घटना घडली आहे. उंचावरून खाली पडल्यामुळे ते श्वान गंभीर जखमी झाले आहे, ज्यामुळे प्राणी प्रेमी चांगलेच संतापलेले आहेत. या संदर्भात प्राणी प्रेमी संस्था सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशनच्या सदस्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
स्नेहल नगर परिसरारील राहुल नामक इसमाने मुलांना खेळण्यासाठी तीन-चार महिन्यांचे कुत्र्याचे पिल्लू घरी आणले होते. मात्र चार दिवसातच त्याचा त्या पिल्लापासून मोहभंग झाला. त्यानंतर त्याने त्या कुत्र्याला दूर सोडून दिले. मात्र पिलाला मुलांचा लळा लागल्याने ते पिल्लू परत-परत राहुल यांच्या घरी येऊ लागलं. संतापलेल्या त्या इसमाने पिल्लाला रात्रभर गच्चीवर ठेवले. त्यानंतर सुद्धा त्याचा राग शांत न झाल्याने त्याने चक्क त्या पिल्लाला गच्चीवरून खाली फेकून दिले, ज्यामुळे ते कुत्र्याचं पिल्लू गंभीर जखमी झाले आहे.
या संदर्भात सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशनच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेव्ह स्पिचलेस ऑर्गनायझेशनच्या सदस्यांना या संदर्भात माहिती समजताच त्यांनी त्या कुत्र्याला रुग्णालयात नेऊन उपचार केले. सध्या हे पिल्लू संस्थेच्या शेलटर होममध्ये असून प्रचंड दहशतती आहे, ते कुणालाही जवळ देखील येऊ देत नाहीय.

Leave a Reply