संपादकीय संवाद – आज काँग्रेसमध्ये घराणेशाही सम्पवून लोकशाही आणण्याची गरज

उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केल्यावर राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेषतः काँग्रेस पक्षात तर विविध ज्येष्ठांनी तोंड उघडले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने आता इतरांचे ऐकण्याची वेळ आली असल्याचा सल्ला दिला आहे. १३६ वर्ष जुन्या पक्षातून इतक्या सहजतेने कोणी बाहेर जात असेल तर त्याची काळजी व्हायलाच हवी असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष म्हणून ओळखला गेला आहे. एका काळात या काँग्रेसचे संपूर्ण देशावर साम्राज्य होते,आज काँग्रेस पक्ष औषधालाही उरलेला नाही. ज्या संसदेत साडेचारशेच्या आसपास सदस्य असायचे त्या संसदेत आता ५० च्या आसपास काँग्रेस सदस्य दिसत आहेत. राज्यांमध्येही मोजक्याच ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे. हे सर्व मुद्दे बघता कपिल सिब्बल यांच्यासारख्या ज्येष्ठांनी दिलेल्या सल्ल्यांवर पक्षनेतृत्वाने विचार करायला हवा.
काँग्रेसची अशी दुर्गती होण्यामागे नेमकी करणे काय? याचाही शोध घेतला जायला हवा. एका काळात काँग्रेसमध्ये लोकशाही होती, विशेषतः स्वातंत्र्यलढ्यात योगदान देतांना देशातील सर्व स्तरातील मान्यवर काँग्रेससोबत आले होते. त्यावेळी काँग्रेसचे नेतृत्वही वेळोवेळी लोकशाही पद्धतीने बदलले जात होते, मात्र स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसचा पूर्ण ताबा नेहरू परिवाराने घेतला. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांच्यानंतर इंदिरा गांधी मग राजीव गांधी नंतर सोनिया गांधी आणि आता राहुल तसेच प्रियांका गांधी हेच काँग्रेस पक्षाचे तारणहार आहेत असा आभास निर्माण केला जातो. या प्रयत्नात काँग्रेसमध्ये नवे सक्षम नेतृत्व उभे होऊ दिले जात नाही. काँग्रेसमध्ये गेल्या ७५ वर्षात अनेक सक्षम नेते पुढे आले मात्र कोणीही पक्षाला नेतृत्व देण्याइतपत मोठे झाले नाही किंवा त्यांना मोठे होऊ दिले नाही. त्यामुळे सर्व काँग्रेसजन हे गांधी परिवाराच्या तोंडाकडे बघतात आणि गांधी परिवारातील आजचे नेते हे दुर्दैवाने पक्षाला आणि देशाला नेतृत्व देण्यास पुरेसे सक्षम नाहीत हे स्पष्ट दिसते आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्ष नामशेष होण्यापासून वाचवायचा असेल आणि काँग्रेसला पुन्हा जुने दिवस आणून द्यायचे असतील तर काँग्रेसमध्ये आता घराणेशाही संपवून लोकशाही प्रस्थापित करणे गरजेचे झाले आहे. सध्या काँग्रेस नेहरू गांधी परिवाराची झाली आहे ही परिस्थिती बदलून भविष्यातील काँग्रेस ही महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस, दादाभाई नौरोजी अशा दिग्गजांची काँग्रेस व्हायला हवी हे जर झाले तरच काँग्रेसला बरे दिवस येतील अन्यथा १३६ वर्ष जुना असलेला हा पक्ष फक्त इतिहासात नोंद करण्यापुरताच शिल्लक राहील याची नोंद प्रत्येक काँग्रेसजनाने आणि काँग्रेस हितचिंतकाने घ्यायला हवी.

अविनाश पाठक

Leave a Reply