स्कुल व्हॅन चालकांनी नागपुरात केले आंदोलन

नागपूर : ९ जून – स्कूल व्हॅन आणि बस चालकांना प्रवासी वाहतुकीची परवागी द्यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शालेय विद्यार्थी वाहतुक व्यवसाय बचाव संघर्ष समीतर्फे छत्रपती चौक, वर्धा मार्गावर आंदोलन करण्यात आले. तीन तास चाललेल्या आंदोलनात शेकडो पीडित सहभागी झाले होते. सरकार… मायबाप… तीन हजार कुटुंबांच्या जीवन, मरणाचा प्रश्न आहे. कधी सुरू होतील शाळा अन् कधी मिळेल रोजगार असा सवाल स्कूल व्हॅनसह बस चालक-मालकांनी उपस्थित केला.
रोजगाराचे साधन नसल्याने कर्ज घेवून व्हॅन, बस खरेदी केली. अजून कर्जाचे हप्तेही पूर्ण भरले नाही, तोच कोरोनाचे संकट उभे ठाकले. शाळा महाविद्यालय बंद झाले अन् व्यवसाय ठप्प झाला. जगणे आणि कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला. गेल्या 15 महिन्यांपासून परिस्थितीशी संघर्ष सुरू आहे. मात्र, काही केल्या मार्ग निघत नाही. दरम्यान संघटनेतर्फे विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. त्यांच्याकडून कर्जाचे हप्त्यांसाठी संप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आल्याने दिलासा मिळाला. मात्र, पोटापाण्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे व्हॅन चालक मालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यानुसार मंगळवारी सकाळी 9 वाजता शहरातील स्कूल व्हॅन आणि बस चालक मालक छत्रपती चौकात एकत्रित झाले. चक्का जाम करण्याची तयारी होती. मात्र, पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असल्याने नारे निदर्शने करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
निवेदनात म्हटले की, दहा महा 10 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, वाहन बंद असल्याचे तारखेपासून व्यवसाय कर, प्राप्तीकर माफ करावा, गाड्यांचे आयुष्य 5 वर्ष वाढवून 15 वरून 20 वर्ष करण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या. चंद्रकात जंगले यांच्या नेतृत्वातील आंदोलनाता हेमंत सुरकार, श्यामसुंदर सोनटक्के, नितीन पात्रीकर, महेश बुरबुरे, दिनेश सारवे, गजानन डोईफोडे, गजानन ठाकरे, इंद्रसेन ठाकूर, राजेश बुरबुरे, हेमंत गजभिये, राजेश रंगारी, अनिल सिंग, सचिन येलोरे, अशोक पैदलवार, एकनाथ गुरनुले, कपिल खाडे, नंदु गावडे, पंकज डहाके, सूरज पडोळे यांचा समावेश होता.

Leave a Reply