पंतप्रधानांचे निवृत्त विशेष कार्यकारी अधिकारी राम खांडेकर यांचे निधन

नागपूर : ९ जून – माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे तत्कालीन विशेष कार्यकारी अधिकारी राम खांडेकर यांचे मंगळवारी रात्री उशिरा नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा मुकुल, सून संगीता, दोन नातवंडे गौरांंग आणि जान्हवी तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे.
खांडेकर यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणून दीर्घकाळ काम पाहिले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री मोहन धारिया आणि वसंत साठे यांचेही ते स्वीय सचिव होते. पी. व्ही. नरसिंहराव यांनी राम खांडेकर यांना १९८५ मध्ये रामटेक मतदार संघाच्या व्यवस्थापनासाठी बोलवले होते. १९९१ मध्ये जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले तेव्हा खांडेकर हे त्यांचे ओएसडी म्हणून सर्वात निकटचे व विश्वासार्ह मानले गेले. राम खांडेकर यांनी नरसिंह रावांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्यासोबत काम केले.
राम खांडेकर विविध वृत्तपत्रांसाठी लेखन करीत असत. विविध राजकीय नेत्यांबरोबरचे त्यांचे संवाद आणि अनुभव यावर आधारित सुमारे 70 लेख विविध दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेले आहेत. 2018 मध्ये त्यांनी सत्तेच्या सावलीत पाच दशकांहून अधिक सार्वजनिक जीवनातील विस्तीर्ण अनुभवाच्या आधारे साप्ताहिक स्तंभ लिहिले. हेच 2019 मध्ये राजहंस पब्लिकेशनच्या ”सत्तेच्या पडछायेत” या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झाले होते.
खांडेकर यांच्या पार्थिवावर आज सकाळी ९ च्या सुमारास नागपुरातील अंबाझरी स्मशानभूमीत मोजक्या निकटवर्तीयांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा मुकुल याने त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
खांडेकर यांच्या निधनाबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत दुग्धविकास मंत्री सुनील केदार प्रभृतींनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply