नागपूरच्या विभागीय आयुक्तांची बदली

नागपूर : ८ जून – नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची शासनाने बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त या पदावर बदली केली आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या जागेवर कुठल्याच अधिकार्याला देण्यात आलेले नाही.
डॉ. संजीव कुमार यांनी कोरोनाच्या काळामध्ये नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी करण्यासाठी चांगले प्रयत्न केलेत. त्यांनी कोरोनाशिवाय विद्यार्थी हिताच्या शिक्षण विभागातही चांगले काम केले. असरच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यावर भर दिला. याशिवाय विभागातील रेती घाटाचे लिलाव योग्य पद्धतीने पार पाडून विभागाचा महसूल वाढविण्यावर भर दिला. विशेष म्हणजे त्यांनी नागपुरातील फ्लाइंग क्लबचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्त्वाचे काम पार पाडले. याशिवाय डॉ. संजीव कुमार यांनी इतरही विविध विषयांमध्ये आपल्या कार्यकाळामध्ये चांगले काम करून एक छाप सोडली. आता त्यांची बदली बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदावर बदली करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील आदेश सोमवारला सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) सुजाता सैनिक यांनी जारी केला असून, डॉ. संजीव कुमार यांना त्यांनी त्यांचा सध्याचा पदाचा कारभार अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) यांच्या सल्ल्याने इतर अधिकार्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे आदेशही दिले आहेत. परंतु अद्यापपर्यंत डॉ. संजीव कुमार यांच्या जागी शासनाने कुठल्याही अधिकार्याची नियुक्ती न केल्यामुळे विभागीय आयुक्त पदाचा प्रभार कुठल्या अधिकार्याकडे सोपविण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply