वेबिनार

२४ मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला. पहिले १०-१५ दिवस तर लॉकडाऊन म्हणजे काय हेच कळायला लोकांना
वेळ लागला. काय सुरू राहणार, काय बंद राहणार, बाहेर जाता येईल किंवा नाही? गेलो तर कस जाता येईल?
अश्या अनेक प्रश्नांची उत्तर मिळायला वेळ लागला. हा सुरवातीचा काळ गेल्यावर माहिती येऊ लागली. कॉर्पोरेट
जग, सरकार कस काम करत ते कळायला लागलं. त्यांच्या इंटरनेट वापरून मिटिंगा कश्या होतात ते लोकांना
कळायला लागलं.
त्यानंतर तर वेबिनार म्हणजे आभासी (virtual) जगातील सेमिनार च पिकच आल. जो उठला तो कशा न कशा वर
वेबिनार घेऊ लागला. त्यात मोदीजींनी ऑनलाइन व्यवहाराला प्रोत्साहन दिले, त्यामुळे लोकांचा उत्साह द्विगुणीत
झाला.
झूम ॲप हि वेबिनार वाल्यांची लाडकी झाली. हि ॲप वापरुन वेबिनार घेण सोप झाल. त्यात हि ॲप बिनखर्चाची
असल्यामुळे लवकरच लोकप्रिय झाली. हि ॲप चीनची असल्यामुळे त्यावरही चर्वित-चरण झाल, उलट-सुलट चर्च्या
झाल्यात. मग काही लोकांनी वेगळी चूल मांडली आणि ईतर ॲप वापरायला सुरू केल.
या रोजच्या होणार्या वेबिनारची माहिती मग फिरू लागली. काहींनी या वेबिनारची माहिती देणार्या वेबसाईट
काढल्यात, काहींनी व्हाट्सॲप ग्रुप तयार केलेत, काहींनी मोबाईल ॲप तयार केली, आणि हि माहिती फिरू
लागली. माहितीचा एवढा भडिमार झाला कि तिचा तिटकारा यायला लागला. या वेबिनारचे विषयही वेगवेगळे
होते किंबहुना आहेत. शाळा ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे शैक्षणिक विषय आहेत. कौशल्य
वर्धनासाठी विषय आहेत, स्वत:चा व्यवसाय/उद्योग कसा सुरू करावा, स्टार्ट-अप कसे सुरू करावे, वाढवावे, फंडिंग
कुठून/कसे मिळवावे. हे सर्व करोना असताना आणि करोना गेल्यावर अश्या दोन भागात विभागले गेले आहे. काही
विषय तर फारच गमतीदार आहेत. माणसांसाठी, झटपट पाककला, कमी वेळात भांडी स्वच्छ कशी घासावी,
बायकोला मदत कशी करावी, कमी श्रमात झाडू-पोछा कसा करावा, नवरा-बायको ने एकोप्याने कसे राहावे, भांडण
झाल्यास झटपट कसे मिटवावे, नवरा-बायको/प्रियकर-प्रेयसी साठी संभाषण कला, नवरा-बायको/प्रियकर-प्रेयसी नी
दूर राहून प्रेम कसे टिकवावे, वगैरे अश्या अनेक विषयांवर वेबिनार आहेत.
झूम ॲप लोकप्रिय झाल्यामुळे तिचा उपयोग अनेक लोकांनी केला, पण त्यामुळे अनेक गंमती-जमती पण घडल्या.
एका प्रसिद्ध बॅडमिंटन प्रशिक्षकाच्या ऑनलाइन प्रशिक्षणाच्या शिबिरात, प्रशिक्षण सुरू असताना एकदम पोर्न
विडियो दिसायला लागले, त्यामुळे ते शिबीर बंद करावे लागले. एका सायबर हॅकर नी त्या शिबिरात प्रवेश मिळवला
त्यामुळे असे झाले. अश्या हॅकिंगच्या बर्याच घटना घडल्या. एका चर्चच्या ऑनलाइन कार्यक्रमात हि अस घडल.
याचा परिणाम असा झाला की काही आंबट शौकिन लोकांनी उगीच झूम वर मीटिंगा घेण सुरू केल. त्यांनी आपले
पासवर्ड हि सर्वांना दिसतील असे नेट वर टाकले. आशा एकच की त्यांची मीटिंग हॅक होईल आणि त्यांना काही खास
दिसेल, पण त्यांच्या दुर्दैवाने तस काही झाल नाही आणि त्यांच्या पदरी निराशाच आली.
तरुणांना नवीन तंत्रज्ञानाची चांगली जाण असल्यामुळे या वेब मीटिंग ते चांगल्या पद्धतीने हाताळतात. पण ज्यांना
तंत्रज्ञानाशी जुळवून घेता आल नाही त्यांची मात्र पंचाईत होते व त्यातून अनेक गंमती-जमती घडतात. मागल्या
आठवड्यात मी एका एनजीओ च्या मीटिंगला उपस्थित होतो. त्यात एक गृहस्थ चक्क सँडो बनियन मधे उपस्थित
होते. शेवटी ॲडमिन ने त्यांना शर्ट घालून यायला सांगितले. घरून मीटिंग करायची म्हंटल्यावर, घरी जस राहातो
तसच मीटिंगला उपस्थित राहायच असा बहुधा त्यांचा समज झाला असावा.
दुसर्या एका मीटिंगला मी उपस्थित होतो. मीटिंग सुरू झाली, आणि थोड्या वेळाने एका उपस्थिताची लक्ष्मी
कडाडली, “काय हो सतत मोबाईल वर खेळत असता, तुम्हाला 3 खोल्या झाडायला सांगितल्या त्या अजून झाडल्या
नाहीत.” बिचार्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. त्यांनी त्यांचा विडियोला थोडा विराम दिला आणि लक्ष्मीला
समजावून मीटिंगला परत आलेत.

आणखी एका मीटिंग मधे एका उपस्थिताच्या कॅमेराचा मोड बदलला आणि मागच्या कॅमेरातून त्यांचे पाय वगैरे
दिसायला लागले. थोड्या वेळाने कळल की ते अर्ध्या चड्डीत होते आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. मग एकानी
त्यांच्या ध्यानात आणून दिले.
स्त्रीयांनी स्वता:चा व्यवसाय कसा करावा यावर एका वेबिनर ला मी तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करावा यावर
बोलायला उपस्थित होतो तर त्यात एक महिला चक्क मेथी तोडत होती. कदाचित वेबिनारने प्रभावित होऊन तींनी
तोडलेली भाजी विकायचा व्यवसाय सुरू सुद्धा केला असावा.
सध्या सर्व इंजीनीरिंग कॉलेजेस निरनिराळ्या विषयांवर वेबिनार घेत सुटले आहेत. एका ओळखीच्या प्राध्यापकाला
मी विचारले “तुमच्या विभागाच्या सर्व वेबिनार मधे तुम्ही कसे काय उपस्थित असता?”, तर तो म्हणाला “मी
वेबिनार सुरू करून देतो आणि माझी काम करतो किवा पेपर घेऊन वाचत बसतो”. तो पुढे म्हणाला “एक दोनदा तर
वेबिनार संपूनही गेला तरी मी आणि माझ्या सारखे 1-2 जण उपस्थितच होतो”. मला, आमच्या लहानपणी गणपतीत
कार्यक्रमानंतर, एक दोन जण सतरंज्या उचलायला थांबायचे त्याचीच आठवण झाली.
तर अश्या अनेक गंमती-जमती आहेत. सांगयला बसलो तर वेळ पुरणार नाही. या वेबिनारच एवढ पीक आल आहे कि
आता कंटाळा यायला लागला आहे. तेंव्हा “वेबिनार पासून कसे मुक्त व्हावे” याचाच एक वेबिनार घ्यायचा माझा
विचार आहे. त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल अशी माझी खात्री आहे. तुम्ही नक्की येणार नं? काळ, वेळ,
जागा ठरली कि कळवतोच.

डॉ. मुकुंद पैठणकर

Leave a Reply