देशाला निरर्थक गप्पांची गरज नाही – राहुल गांधींची मोदींवर टीका

नवी दिल्ली : ३० मे – देशात कोरोनाचा कहर असून विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट, ऑक्सिजन आणि लस तुटवडा आदी मुद्यांवरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारवर टीका करत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मधून देशवासियांची संवाद साधला. यावरून राहुल गांधींनी ‘महिन्यातून एकदा देशाला निरर्थक गप्पांची गरज नाही’ अशी टीका केली.
कोरोनासोबत लढण्यासाठी देशाला योग्य नियत, धोरण आणि निश्चयाची गरज आहे. प्रत्येक महिन्याला निरर्थक गप्पांची गरज नाही, असे टि्वट राहुल गांधींनी केले. मोदींच्या खोट्या प्रतिमेसाठी कोणत्याही विभागाच्या मंत्र्याला कोणत्याही विषयावर बोलणे भाग आहे, असे टि्वट राहुल गांधींनी यापूर्वी केले होते. तसेच त्यांनी शनिवारीटि्वट करून देशाला व्यापक लसीकरणाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होतं. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खोटे बोलणे बंद करा आणि व्यापक लसीकरण मोहीम राबवा, असे राहुल गांधी टि्वट करून म्हणाले होते.
शुक्रवारी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरी टीका केली होती. पंतप्रधानांच्या नौटंकीमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत. देशात ज्या पद्धतीने लसीकरण सुरू आहे. ते पाहता लसीकरणासाठी तीन वर्ष लागतील. त्यामुळे वेगाणे लसीकरण करा. लसीकरण केल्यासच कोरोनापासून आपली सुटका होईल. जेथून लस खरेदी करता येईल. तेथून खरेदी करा आणि लसीकरण करा. कारण न देता, दुसऱ्यावर चुका न ढकलता काम करा, असे राहुल गांधी म्हणाले.
कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशानं आपली संपूर्ण ताकद लावली. गेल्या शंभर वर्षातील ही सर्वात मोठी महामारी आहे. या कोरोना महामारीसोबतच भारताने अनेक नैसर्गिक संकटांचाही सामना केला. अम्फान, निसर्ग तौक्ते, यास ही चक्रीवादळ तर उत्तराखंडमध्ये भूस्खलन आणि भूंकप झाला. मात्र, जनतेने जनता संपूर्ण ताकदीनिशी संकटाचा सामना केला, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी त्यांच्या कार्यकाळाला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवरही भाष्य केले.

Leave a Reply