रस्ते बांधकामात येणार्या नवीन कल्पना,संशोधन अभियंत्यांनी स्वीकारावे : गडकरी

नागपूर : ३० मे – रस्ते बांधकामाच्या खर्चात बचत करण्यासाठी शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील अभियंत्यांनी संशोधनातून येणार्या नवीन कल्पना, नावीन्य स्वीकारावे व त्याला आपला सकारात्मक पाठिंबा द्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘ब्रिज डेक इरेक्शन टेक्नॉलॉजी’ या विषयावरील आभासी कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महामार्ग वाहतूक राज्यमंत्री डॉ. जन. व्ही. के. सिंग, आय. के. पांडे, हर्षवर्धन सुब्बाराव, महामार्ग प्राधिकरणाचे सदस्य पांडे आदी उपस्थित होते. रस्ते बांधकामाची गुणवत्ता वाढविणे, बांधकाम खर्च कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे आता आवश्यक आहे. या साठी शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील अभियंते, कंत्राटदार यांनी सकारात्मक विचार केला पाहिजे, असे सांगताना गडकरी म्हणाले- बांधकामाचे आरोग्य हेही महत्त्वाचे आहे. सिमेंट आणि स्टील यावर आता पर्याय शोधला पाहिजे. पण नवीन काही तंत्रज्ञान, कल्पनांचा वापर करायचा असेल तर अनेकदा नकारात्मक भूमिका घेतल्या जातात. खर्चात बचत करण्यासाठी नवीन कल्पनांचा उपयोग केला जात असेल, तर त्याचा सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर रस्ते बांधकामात गेल्या दोन वर्षांपासून केला जात आहे. हा एक नवीन प्रयोग आहे. बांधकामाच्या दर्जात कोणताही समझोता न करता फायदा होत असेल तर निश्चितपणे त्याचा विचार केला गेला पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.
‘एक्स्पान्शन जॉईंट’बाबत बोलताना गडकरी म्हणाले-
‘एक्स्पान्शन जॉईंट’ योग्य पध्दतीने दिले जात नाहीत. या संदर्भात परदेशात जर चांगले तंत्रज्ञान, यशस्वी प्रयोगांचे अनुभव असतील तर ते स्वीकारले गेले पाहिजेत. भारतात महामार्ग बांधकाम क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली जात आहे. चांगले परिणाम आणि चांगला दर्जा यासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply