नागपुरात भरवस्तीत शिरला बिबट्या

नागपूर : २९ मे – नागपूर शहरातील आयटी पार्कजवळील गायत्रीनगर परिसरात नरेंद्र चकोले यांच्या घरातील स्नानगृहात शुक्रवारी सकाळी बिबट शिरल्याने एकच खळबळ उडाली. वनखात्याचा चमू पोहोचण्याआधीच तो पसार झाला. या परिसरात आता कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून खात्याचा चमू याठिकाणी सकाळपासून तळ ठोकून आहे.
तीन वर्षांपूर्वी पोलीस नगरात एका कर्मचाऱ्याच्या स्नानगृहात बिबटय़ाने ठाण मांडले होते. रात्री उशिरा या बिबटय़ाला बेशुद्ध करून पिंजऱ्याआड करण्यात आले होते. मात्र, शुक्र वारी भरवस्तीत बिबट शिरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. नरेंद्र चकोले यांनी सकाळी स्नानगृहात प्रवेश करताच त्यांना बिबटय़ा दिसला. त्यांनी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत बिबटय़ाने शेजारी किशोर जगताप यांच्या घराच्या आवारात व नंतर राष्ट्रीय विद्युत प्रशिक्षण प्रतिष्ठानच्या आवारात उडी घेतली. सुमारे पाच हेक्टर क्षेत्रात प्रतिष्ठानची जागा असून याठिकाणी जंगल आहे. सर्वात आधी सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राचा चमू व त्यानंतर हिंगणा वनपरिक्षेत्राचा चमू व सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्राचा चमू तेथे पोहोचला. दिवसभर हा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. श्वानपथकाच्या सहाय्याने देखील याठिकाणी शोध घेण्यात आला. दरम्यान, या परिसरात आता सहा ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे. या परिसरातील नागरिक तसेच सुरक्षा रक्षकांनी एकटेदुकटे फिरण्याचे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply