आता पंतप्रधानांची भेट व्हायला हवी – मराठा आरक्षण प्रकरणी खा. संजय राऊत

मुंबई : २९ मे – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेठी घेतल्या आहे. पण, राज्यातील नेत्यांच्या भेटी होतच राहतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट व्हायला हवी, असं परखड मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खासदार संभाजीराजे यांच्या भेठीगाठी सत्रावर आपले मत व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे.
‘मराठा समाजाचा संताप आणि त्यांची भूमिका समजून घेण्याची गरज आहे. माझ्या माहिती प्रमाणे संभाजीराजे हे राज्यातील प्रमुखांना भेटले आहे. शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. अशोक चव्हाण यांना भेटले आहे. इतर राजकीय पक्षातील नेत्यांना सुद्धा भेटले आहे. पण सर्वात महत्त्वाची भेट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट व्हायला हवी’, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
‘मराठा आरक्षणाचा विषय हा राज्य सरकारच्या हातात राहिला नसून तो केंद्र सरकारच्या हातात आहे. त्यामुळे आम्ही सगळे मराठा समाजाला न्याय कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्ही संभाजीराजे यांच्यासोबत आहोत, त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सगळे पंतप्रधानांना भेटायला जाण्यास तयार आहोत’ असंही राऊत म्हणाले.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी असा कोणताही राजकीय पक्ष असा विषय येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात हा हुकमाचे पान आहे. त्यांनी त्याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले असे तिन्ही पक्षाचे नेते एकमुखाने, एकमताने संभाजीराजे यांच्या आणि आंदोलकांच्या पाठीशी आहे, असंही राऊत म्हणाले.

Leave a Reply