वैद्यकीय विद्यार्थ्यांनी दिले विरोधी पक्षनेत्यांना निवेदन

गोंदिया : २८ मे – गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच उद्रेक केला होता. दरम्यान वाढत्या बाधितांच्या संख्येने आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना रूग्णसेवेसाठी पुढाकार घेण्याचे आग्रही आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले होते. त्यानुरूप अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोविड काळात सेवा दिली. त्यामुळे शासनाकडून वाढीव विद्यावेतन प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, शासनाचे विमा कवच देण्यात यावे आदि मागण्यांचे निवेदन अंतरवासियता डॉक्टरांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून सादर केले.
कोरोना संसगार्चा उद्रेक होत असताना आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला होता. त्यातच कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढला आहे. सध्यास्थिती कोरोना व म्युकरमायकोसिस रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या आव्हानानुसार, नुकतेच अंतिम वर्षीय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी रुग्णालयातील विविध वार्ड, विभाग, प्रयोगशाळा आदि ठिकाणी रुजू झाले आहेत. व जीवाची पर्वा न करता धोका पत्कारून आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु, शासनाकडून त्यांची दखल घेतली जात नाही. अशातच निधीअभावी उपचार न मिळाल्यामुळे अंतरवासियता डॉ.राहुल पवार याला जिव गमवावा लागला.
असा दुदैर्वी प्रसंग कोणाही अंतरवासियता डॉक्टरावर येऊ नये, अंतरवासियता डॉक्टरांच्या आरोग्यास असलेला धोखा लक्षात घेवून त्यांना शासनाकडून आरोग्य विमा सुरक्षा कवच मंजूर करणे, शासनाकडून वाढीव विद्यावेतन प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे आदि मागण्यांना घेवून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यावर आपण वैयक्तिकरित्या लक्ष घालून ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे आश्वासन विरोधी नक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डॉक्टरांना दिली. याप्रसंगी खा.सुनिल मेंढे, आ.परिणय फुके उपस्थित होते. निवेदन देताना डॉ.फैसल सादिक शेख, डॉ.सुर्यकांत अशोकराव चौधरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply