यवतमाळात शहरानजीक पट्टेदार वाघासह बिबट्याच्या आढळल्या खुणा, नागरिकांत भीतीचे वातावरण

यवतमाळ : २८ मे – यवतमाळ शहरालगत एमआयडीसी परिसरातील जंगलात पट्टेदार वाघासह बिबटय़ाच्या वास्तव्याच्या खुणा आढळल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. औद्योगिक वसाहतीस लागून असलेल्या एका शेतात बिबटय़ाने दोन गायींची शिकार केल्याने वनविभागाने या परिसरात ‘ट्रॅप कॅमेरे’ लावून शोध सुरू केला आहे.
यवतमाळ येथील कांजीभाई यांचे लोहारा येथील एमआयडीसी परिसरात शेत आहे. त्यांनी शेतात ऊस तसेच केळीची लागवड केली आहे. या पिकांमुळे येथे थंडावा राहतो. रखरखत्या उन्हात थंडावा मिळावा म्हणून वाघ मागील वर्षी या शेतातच डेरा टाकून बसला होता. उन्हाळा संपल्यानंतर मात्र हा वाघ आपले वास्तव असलेल्या जंगलात निघून जायचा. मागील वर्षीपासून हा वाघ मात्र आता हिवरी, चौसाळा तसेच उत्तर वाढोणासह परिसरातील जंगलात फिरत आहे. त्यामुळे जंगलाशेजारील गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कांजीभाई यांच्या शेताजवळ आता बिबटय़ाचे अस्तित्व आढळून आले आहे. या बिबटय़ाने २० आणि २२ मे रोजी दोन गायींची शिकार केली. तसेच येथे वाघाचे ‘पगमार्क’ही आढळून आले आहे. त्यामुळे गतवर्षीचा वाघ पुन्हा या शेतात आला असल्याचे सांगण्यात येते.
वाघाच्या भीतीने या शेतकऱ्याने गोठय़ाला संरक्षण जाळी लावली आहे. गतवर्षी हा वाघ वन विभागाच्या ट्रॅप कमेऱ्यात कैद झाला होता. आता ऊन्हाचा पारा वाढताच हा वाघ या परिसरात फिरत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. शिवाय याच शेताजवळ बिबटय़ाने गायींची शिकार केल्याने भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्याने याप्रकरणी वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर वनविभागाकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. परिसरात वाघाचे पगमार्क आढळून आल्याने वनविभागही दक्ष झाला असून, येथे पुन्हा एकदा ‘ट्रॅप कॅमेरे’ लावून वन्यप्राण्यांचा शोध घेतला जाणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply