गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात मादी बिबट आढळली मृतावस्थेत

नागपूर : १९ जानेवारी – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. चांदणी नावाने ती सर्वपरिचित होती. प्राणीसंग्रहालयातील कर्मचारीसुद्धा तिला या नावाने ओळखायचे. अन्य बिबट्यासोबतच्या संघर्षात तिचा मृत्यू झाला असावा, असा कयास लावला जात आहे.
गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना सफारी पिंजऱ्यात सोडण्यात येते. त्यांच्या आरामासाठी रात्र निवाऱ्याचीही व्यवस्था आहे. गेल्या आठवड्यापासून चांदणी रात्र निवाऱ्यात परतली नव्हती. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून शोध घेण्यात येत होता. मात्र, त्यात यश येत नव्हते. यामुळे विशेष शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास चांदणी मृतावस्थेत आढळून आली.
पिंजऱ्यात अडकला नर बिबट
चांदणीचा शोध लागत नसल्याने परिसरात बिबट पकडण्याचा पिंजरा लावण्यात आला होता. मात्र दुसऱ्या दिवशी पहाटे या पिंजऱ्यात एक नर बिबट अडकल्याचे दिसले. तो गोरेवाडा जंगलातून सफारी पिंजऱ्यात शिरला असण्याची शक्यता आहे. या बिबट्याला सायंकाळी उशिरा निसर्गमुक्त करण्यात आले.
सायंकाळी उशिरा दहन
चांदणी मृतावस्थेत आढळून आल्यानंतर नियमानुसार शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मृतदेहाच्या अवस्थेवरुन अन्य बिबट्यासोबतच्या संघर्षात तिचा मृत्यू झाला असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. सायंकाळी उशिरा सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यानंतर मृतदहाचे दहनप्रक्रिया पार पाडण्यात आली.

Leave a Reply