मोदींनी आधी कश्मीरी पंडितांचा जीव वाचवावा – संजय राऊत

श्रीनगर : १९ जानेवारी – शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत आज (गुरुवार) जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेत संजय राऊतही सहभागी होणार आहेत. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. जम्मू-काश्मीरमध्ये संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती.
२०१४ मध्ये सर्वात मोठा मुद्दा काश्मीरचा होता. या मुद्द्यावर लोकांनी मतदान केले. पाकव्याप्त कश्मीर भारतात आणू, असा प्रचार मोदींनी केला होता. मोदींनी ते नंतर बघावं पण आधी कश्मीरी पंडितांचा जीव वाचवावा. ही छोटी गोष्ट मोदी सरकार करु शकत नाही आणि पाकव्याप्त कश्मीरच्या गोष्टी करता. बाळासाहेब ठाकरे पहिले नेते होते ज्यांनी कश्मीरी पंडितांचा मुद्दा उचलला, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी सरळ पाकीस्तानला जावे, असा टोला शिंदे गटाच्या नेत्यांनी लगावला होता. यावर संजय राऊत यांनी पलटवार केला. पाकीस्तानमध्ये तुम्ही जायला पाहिजे होते. तुम्ही अखंड भारत आणि पाकव्याप्त काश्मीर बाबात घोषणा केल्या होत्या. तुम्हाला हे जमत नसेल तर आम्ही जाऊन घेऊन येऊ. आमचे सरकार आले तर आम्ही करु. पाकिस्तान ताब्यात घ्यायला आम्हाला जावं लागेल, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला.
भाजप नेहमी कश्मीरी पंडीतांच्या मुद्द्यावर राजकारण करते. मात्र हा राजकारणाचा विषय नाही. नरेंद्र मोदी यांनी आधी कश्मीरी नागरीकांच्या समस्या सोडवाव्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये यावे, असे आवाहन राऊत यांनी केले.

Leave a Reply