याकूबच्या कबर सजावटीपासून नालेसफाईच्या भ्रष्टाचारापर्यंत सगळं श्रेय उद्धव ठाकरेंचे – आशिष शेलार

मुंबई : १९ जानेवारी – मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आहे. विविध कामाचं भूमिपूजन आणि विविध प्रकल्पांचं लोकार्पण यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. यावरून ठाकरे गटाने आम्ही केलेल्या कामांचंच उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत आहेत. आम्ही केलेल्या कामाचं श्रेयच हे सरकार घेतं आहे अशी आरोपांची जंत्री लावली आहे. या सगळ्याला आशिष शेलार यांनी आता ट्विट करून उत्तर दिलं आहे. याकूबच्या कबर सजावटीपासून नालेसफाईतल्या भ्रष्टाचारापर्यंत सगळं श्रेय उद्धव ठाकरेंचंच आहे असं आशिष शेलार म्हणाले आहेत.
याकूबची कबर सजवणे, मनसुख हिरेनची हत्या, दाऊदच्या मालमत्तांची खरेदी, बदल्यांमध्ये वसुली, सचिन वाझे, नालेसफाईत भ्रष्टाचार, कोविडमध्ये नातेवाईकांची भलामण, मेट्रो कारशेड रखडवणे ही तुमच्या काळातली विकासकामं आहेत. या सगळ्याचं श्रेय हे निर्विवाद उद्धव ठाकरेंचंच आहे.
पुढे आशिष शेलार म्हणतात, आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि लोकार्पण होतं आहे ही सगळी मुंबईकरांची स्वप्नपूर्ती आहे. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमचा काय संबंध? असलाच तर विरोध करण्याएवढाच. म्हणून आज मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदाच्या क्षणात विरजण घालताय. असं दुसरं ट्विटही आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरूद्ध भाजपा असा सामना सोशल मीडियावर पाहण्यास मिळतो आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ते अडीच वर्षे चाललं. या अडीच वर्षात करोना होता, तरीही महाराष्ट्राचा विकास होण्यापासून आम्ही थांबलो नाही उद्धव ठाकरे थांबले नाहीत. आम्ही विकासकामं केली आहेत त्याचंच लोकार्पण करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावं लागतं आहे. असं ठाकरे गटाकडून सांगितलं जातं आहे. तसंच हे सगळं श्रेय आमचंच आहे हे मान्य झाल्यानेच मोदी येत आहेत असंही सांगितलं जातं आहे. आज सामनामध्ये अग्रलेख लिहूनही हीच भूमिका मांडली आहे. यावर आता भाजपाचे आमदार आणि नेते आशिष शेलार यांनी घणाघाती टीका केली आहे.
‘पंतप्रधान मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी अवतरत आहेत हा प्रचार खोटा आहे. ते त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी व मुंबईवरील शिवसेनेचा भगवा उतरवता येईल काय? या भविष्यातील विचाराने येत आहेत. नव्हे, पंतप्रधानांना त्याच हेतूने मुंबईस बोलावले आहे. पंतप्रधानांच्या शुभहस्ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन वगैरे कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवसेनेच्या कार्यकाळात ज्या योजनांसाठी अर्थसंकल्पांत तरतूद करण्यात आली होती, नियोजन आराखडा तयार करण्यात आला, कायदेशीर अडथळे दूर करण्यात आले, त्याच सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी करीत आहेत आणि त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे’, अशा शब्दांत भाजपावर टीकास्र सोडण्यात आलं आहे.
या टीकेचा समाचार आशिष शेलार यांनी घेतला आहे. त्यांनी मनसुख हिरेनची हत्या ते मुंबईतल्या कोविड काळात झालेला भ्रष्टाचार हे सगळेच मुद्दे उपस्थित करत उद्धव ठाकरेंचं हे श्रेय निर्विवाद आहे असं म्हटलं आहे.

Leave a Reply