ट्रॅव्हल्समधून गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

नागपूर : १६ जानेवारी – ट्रॅव्हल्समधून नागपूरमार्गे बंगरुळू येथे गांजाची तस्करी करणाऱ्या महिलेला धंतोली पोलिसांनी अटक केली. महिलेकडून १३ किलो गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास केली.
जबिना खान (वय ३२, रा. माहूर, नांदेड) असे महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबिना अजनी चौकात ऑरेंज ट्रॅव्हल्समध्ये बसत असताना, तेथील वाहतूक पोलिसांना गांजाचा वास आला. त्यांनी बस थांबवून धंतोली पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक फरताडे यांच्या नेतृत्वातील पथकाने अजनी चौकात जाऊन महिलेच्या बॅगची झडती घेतली असता, तिच्याकडे १३ किलो गांजा आढळला.
ताब्यात घेऊन विचारणा केली असता, हा गांजा बंगरुळू येथे घेऊन जात असल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये जबिनाला अटक केली असून, एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले.
जबिनाला गांजा बंगरुळू येथे नेण्यास सांगण्यात आले. त्यानुसार ती माहूर येथून नागपुरात आली. गणेशपेठ स्थानक परिसरातून बसल्यास शंका येण्याची शक्यता असल्याने तिने अजनी येथून बसण्याचा निर्णय घेतला.
मात्र, तेथील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती पोलिसांच्या जाळ्यात सापडली. बंगरुळूमध्ये गांजा नेमका कोणाला द्यायचा, हे तिला तिथे गेल्यावर सांगण्यात येणार होते, अशी माहिती तिने दिले. त्यामुळे केवळ ‘कॅरिअर’ म्हणून तिचा वापर करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply