स्तुतीपुराण – विजय लिमये

स्तुती कुणाला आवडत नाही? सर्वाना स्वतःची स्तुती आवडतेच, महिलांना जरा जास्तच, असो हा वादाचा विषय होईल.

देव सुद्धा याला अपवाद नाहीत, अहो आपण देवाची पूजा, अर्चना करतो, ही स्तुती नाही का? देवाला स्तुती आवडली की देव सकारात्मक फळ देतो. जर देवांना स्तुती आवडत नसती, तर त्यांनी मनुष्य रुपी जनावर बनवलेच नसते. चौऱ्याऐंशी लक्ष योनीत फक्त मानव प्राणीच देवाची पूजा अर्चना करतो, इतर प्राणी त्याच्याकडे ढुंकूनही पहात नाहीत.

मग प्रश्न हा आहे देवांना माणसाची गरज का भासावी?, 33 कोटी (ही पण एक कोटीच आहे) + 2 (अल्लाह, आणि गॉड) देवांनी माणसाला (बि)घडविले व भूतलावर पाठवले, आणि सांगितले माझी पूजा, अर्चना, जप, तप, सतत सुरू राहू दे. “ही खरी तर स्तुतीच नाही का?”

माणूस प्राणी पण चलाख, त्यांनी देवांच्या सूचनांचे पालन करणे टाळले, देवांनी हर प्रकारे त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण हा काही बधत नव्हता. देवांना आता चिंता सतावू लागली, इतक्या प्रयत्नांनी म्हणजे चौऱ्याऐंशी लक्ष निष्क्रिय, असफल प्रयत्नानंतर कुठे एकदाचे यश मिळाले आणि आपल्याला हवा तसा प्राणी बनविण्यात आल्यानंतर, हा भलताच डांबिस निघाला, व मौज मजा करण्यात गुंग झालाय, ज्या कामगिरीवर पाठवला ते तो पूर्ण विसरून गेला.

बरं भूतलावर त्याच्यासाठी सर्व सोयी सुविधा दिल्या, धडधाकट अवयव दिले ज्याचा वापर करून तो हवेत उडण्याव्यतिरिक्त सर्व काही करू शकत होता. गोड, आंबट, तुरट, तिखट, व काही अंशी कडू….. चवीचे आकर्षण उत्पन्न करून दिल्यामुळे, निसर्गातील जवळ जवळ सर्व फळे, वृक्ष याच्या स्वाधीन केले, शिवाय कंदमुळे ही भेटीदाखल देण्यात गेली, इतके सर्व न मागता मिळाल्यावर कुणाला माज येणार नाही? बरं जे सढळ हाताने देवांनी दिले, ते परत कसे घेणार?

घोर निराशेनी ग्रस्त, देव एकत्र येऊन सल्लामसलत करू लागले, याला वठणीवर आणायचा तरी कसा? तो पर्यंत भिती नावाची भावना माणसाच्या मेंदुरुपी हार्डडिस्क मध्ये प्रोग्रॅम रुपात भरण्यात आली नव्हती, अर्थात कारणही तसेच होते, माणसाला सर्व सुखे दिली होती, त्या बदल्यात त्याने दिवसरात्र देवांची स्तुती करायची ठरली होती. गरजेपेक्षा जास्त सुखे पदरात पडल्यावर, स्तुती करायची कशी लक्षात राहणार?

भिती चा प्रोग्रॅम एकदाचा भरला…., तरीही काहीच होईना…., याला भिती वाटेचना, कारण प्रोग्रॅमने काम करण्याची सिस्टम सुरू झाली नाही. ते ही केले, तरीही भिती नाहीच!, आता देवांच्या लक्षात आले, समोर भिती वाटावी अशी वस्तू नसल्यामुळे, भिती या भावनेला काही महत्व नाही, तिला सिग्नल मिळत नाहीत, मग काम कसे करणार?

असे ठरले की चौऱ्याऐंशी लक्ष योनीतील काही अक्राळ विक्राळ प्राणी मानवाच्या विरुद्ध पाठवावेत, ज्यांना पाहून माणसाची भिती भावना जागृत होऊन, तो आपल्याकडे येईल. परिणाम उलटा झाला, मनुष्याने शस्त्र वापरण्याचे कौशल्य प्राप्त केले, व या प्राण्यांचा मुकाबला करून जय प्राप्त केला. यातून त्याला वेगळीच अनुभूती मिळाली, विरोध करून विजय मिळविण्याचे बळ मिळाले, आता तो कशाला स्तुतीपाठ करत बसेल?

देवांच्या सहनशीलतेचा अंत झाला, कसेही करून मनुष्य प्राण्याला, नाक घासायला लावायचेच याचा ठराव झाला, व मनुष्य देहबोलीचा परंतू अक्राळ, विक्राळ, विद्रुप, विराट, प्राणी जन्माला घातला, ज्याला राक्षस, पिशाच्य, भूत, वगैरे नामकरण करण्यात आले.

चौऱ्याऐंशी लक्ष जातीतील फक्त मनुष्य सोडून कोणताच प्राणी याना घाबरणार नाही असा प्रोग्रॅम करून, म्हणजे फक्त मनुष्याला घाबरवण्याचे काम सोपवले, आणि त्यांनी ते चोख बजावायला सुरवात केली. असे करताना बऱ्याच वेळेस त्यांनी आपल्या क्षमता न ओळखता, देवांना वेठीस धरण्यास सुरवात केली, इथेच खरी गडबड सुरू झाली.

आता मात्र माणसाचा भितीचा प्रोग्रॅम काम करू लागला, व त्याला देवांची आठवण येऊ लागली. मनुष्य तसा चलाख त्यानेही मखलाशी करायची ठरवली, त्याच्या फायद्याचे देव हेरले, व फक्त त्यांचीच आराधना सुरू केली, व त्याच देवांची पूजा करून, त्यांच्या करवी सर्व दानव मारून टाकले. प्रतिकात्मक रुपात त्यातील काही दानव आजही मानव योनीत शिरकाव करून आपला कार्यभाग साध्य करण्याचा प्रयत्न करतात, असो.

स्वतःची स्तुती करवून घेण्यासाठी कोण काय काय उपद्व्याप करेल काही सांगता येत नाही. यात देव सुटले नाहीत तर मनुष्य प्राणी तरी कसा सुटेल? काही मानवांनी आता स्वतःलाच देव मानायला सुरवात केली, आणि भोळ्याभाबड्या जनतेला फुटकळ चमत्कार करून आपल्या सेवेत राहण्यासाठी बाध्य केले.

गदिमांच्या एका गीतात सांगितले आहेच…. तूच घडविशी,…तूच फोडीशी…,कुरवळीशी तू…….शेवटी हे सर्व कशासाठी, स्वतःची स्तुती करवुन घेण्यासाठीच ना?

विजय लिमये
(9326040204)

Leave a Reply