कांचन संध्या – नंदकुमार वडेर

” व्हयं धनी! माझं काय चुकलं का सांगा बरं! आवं एव्हढा मोठा वाडा आपला, पाच दहा एकराचा हिरव्या रानाचा डाग, ती गोठयातली दोन चार दुभती म्हसरं, खिलारी खोंडं आनि फक्त आपून दोघचं. समंध्याकडं बघायला.. दोन पोरं एक पोरगी असा पाच जनांबरोबर त्याचं मैतर, आलागेला पाव्हणा रावळा असा लै मोठा बारदाना एकेकाळी वाडयात नांदत होता कि… पोरं बुद्धीनं हुशार व्हती पटापट कवा मोठी झाली सातासमुद्रापार त्यांना बोलावून नेलं कि त्या गोऱ्यांनी.. न्हाई म्हणायला तिघांचं बी दोनाचं चारं हात करून अक्षता तेव्हढयाच इथं दारात टाकून घेतल्या.. आबा आई असं आम्ही तिकडं जाऊन लगोलग माघारी येतो असं सांगून जे गेले त्याला आता धा वरसं झाली.. पोरगी नांदायला बी तिकडचं गेली की.. आतापतूर दोन तीन येळेलाच उभ्या उभ्या भेटून गेली आई आबा जीती आहेत का बघायला.. आता कायमचं इकडं राहवा बाबानू म्हणून सांगितलं तर अजून दोन वर्षे वाईच कळ काढा असं सांगून पसार व्हायचे.. ते तिकडं नाही गेली तर ती अमेरिका उपाशी पडनार व्हती काय त्यांची? इकडं आई आबाना सांभाळायला, घराकडं शेताकडं बघायला वेळ नाही.. आता तिघास्नी बी पोरंबाळ बी झालीती.. का आम्हाला वाटतं नाही आपली लहान लहान नातवंड या वाडयात खेळावीत, आपल्या मांडीवर बसवून त्यांना खाऊ पिऊ घालावं, लेकरांना माया माया करावी. पन आमचं दुखनं ऐकतो कोण? त्येंच्या आयांना सवड नाही आणि शाळेचा कोंडवाडा सोडत नाही.. चिमण्या पाखरा सारखं झाडाच्या फांदीवर येतात नि भुर्रकन उडून बी जातात.. मंग आम्ही बसतो गावातल्या लहान लेकरांच्या संगतीत आपली हौस भागवत..सतरांदा तिकडं या म्हनून बलिवत्यात.. एकदा जुलमाच्या रामानं जाउन बी आलो तिकडं.. पन लै दिस गमना तत, अख्खा जलम या गावात गेलेला तवा या वयात तिथं कसं करमाया.. तिथं बी दिसभर तुम्ही नि मी त्या घराच्या भिताडाकडं बघत बसायचं. अन रातच्याला मोम नि डॅड च्या फॅडापुढं पावाच्या लादीनं पोट भरायचं…त्या कामवाल्या बाया येसफेस बोलनार तिचं आम्हाला नि आमचं तिला कधी नि कसं कळायचं नाही.. पुवर पेरेंट सारखी काही बाही म्हणायची.. काय सांगायचंय होतं तिला हे शेवटपतूर कळलं नाही बघा… अन पुन्हा म्हणून काही आपून पोरांकडं जायाचं नांव घेतलच न्हाई.. काय असेल तसं इथचं राहू. गावशीव वाल्यांच्या बरोबर असलं म्हणजे माणसात असल्यासारखे वाटतं…पण पण हे अजून किती दिसं चालायचं नि चालवायचं म्हणते मी? तुम्ही कधी तरी याचा इचार केलाय का? का पोरांना आमची पुढची गत काय असेल इचारणार का? उद्याचा कशाला आता घटकाभरानं काय हुतय काय न्हाई याचा नेम सांगता येतुय का?.. आनि त्यात जर का बरं वाईट झालं कुनाचं तर मागं राहिलेल्यानं कसं जगावं बरं ते तरी सांगता येईल का?.. ” आता इथून पुढचं बोलणं डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा जमुनाच सांगत राहिल्या.. पदराचा शेव ओलाचिंब होत राहिला… कांचन संध्या आता खाली उतरून आली..गहिवरतेचा राग आळवू लागली..
“अगं कारभारनी! माझं थोडं ऐकतीस काय? आताच्या वक्ताला मन तुझं कावरंबावरं होऊ देऊ नकोस.. मी तुला अन तूच मला कायमची असनार इथं साथीला हे तू कधी इसरू नकोस.. घरटयातली पिलं पंख फुटे पर्यंत आपल्या जवळ राहिली आणि पंख फुटताच घरटी बांधली त्यांनी कुठे कुठे.. त्यांचा सोनेरी उगवता सूर्य आहे तिकडे आणि आपला मावळता पिवळा तांबूस सूर्य निघालाय अस्ताकडे… चिंतेचे गाठोडे दूर ठेवून देउया या काळया अंधारात.. चार गुजगोष्टी बोलत बसुया रुपेरी चांदण्यात चंद्राला घेऊन सोबतीला..आठवणींच्या पारिजातकाचा सुंगध दरवळून टाकू सल तो एकही उरात नच ठेवू.. आता अवतीभवती च्या मुलामाणसांचा गराडा हाच आनंदाचा ठेवा,, आणि अवचित कधी भेटून जाता पोटचा गोळा, नकोस गुतंवू जीव त्यात सगळा.. येईल त्याला घालू चारापाणी, वेळ तशीच आली आपल्यावर तर करतील कुणी दवापाणी.. माया ममतेचे लावूया अस्तर जोवरी श्वास आपला.. या काठाला जराजर्जरता लावून बसली नजर पैलतीराला , सुखाचे जरीकाठ लावूनी जाऊया इहलोकाला..कोणास ठावे नंबर तुझा कि माझाच पहिला..”
( कवीवर्य बा. भ. बोरकर यांच्या कांचन संध्या कवितेवर आधारीत)

नंदकुमार वडेर, सांगली.
9920978470

Leave a Reply