सुरक्षित वाहतुकीचे महत्व सांगणारे जनआक्रोशचे कॅलेंडर्स प्रकाशित

नागपूर : १० जानेवारी – नागपुरातील जनआक्रोश या समाजसेवी संघटनेने लोकशिक्षणाच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत केले आहे. ही संघटना वाहतूक नियमांचे पालन व्हावे, यासाठी कायम आग्रही असते. संघटनेने नववर्षाचे कॅलेंडर्स प्रकाशित केले असून त्यात प्रत्येक पानावर आकर्षक छायाचित्रांसह वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा संदेश देण्यात आला आहे.
१२ पृष्ठे असलेल्या या कॅलेंडरमध्ये दुचाकीवर दोघांनीही हेल्मेट वापरा आणि ते आयएसआय प्रमाणीतच ठेवा असा सांदेश दिला आहे. तर एका पानावर नियंत्रित वेगात वाहने चालवून अपघात टाळा असा संदेश दिला आहे. वाहनावर अनावश्यक भर नसावा, हे दाखवणारे छायाचित्र एका पानावर आहे तर योग्य जागी पार्किंग करण्याचा संदेश एका छायाचित्रातून दिला आहे.
सिग्नल नसतांनाही सिग्नल तोडून वाहने चालवू नये, कार मध्ये सीटबेल्ट लावावा दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे सांभाळून ओव्हरटेक करावे पादचाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंगचाच वापर करावा अल्पवयीनांना वाहने देऊ नये अकारण हॉर्न वाजवू नये असे विविध संदेश या १२ पृष्ठांच्या कॅलेंडर मध्ये देण्यात आले आहेत.
नागपूर जिल्हा आणि ग्रामीण पोलिसांच्या मदतीने प्रकाशित केलेल्या या कॅलेंडरला अंकुर सीड्स मेघे ग्रुप अशोका बिल्डकॉन प्रो लाईट बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी आणि रुक्मिणी मेटल्स यांनी अर्थसहाय्य केलेले आहे. जनआक्रोशच्या वतीने हे कॅलेंडर्स नागरिकांमध्ये वितरित केले जात असून त्यातून लोकशिक्षण होऊ शकेल असा विश्वास जनआक्रोशच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply