उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी योग्यच – नाना पटोले

नागपूर : १० जानेवारी – महाराष्ट्रातील सत्तावादाचे प्रकरण निवडणूक आयुक्तांकडे न राहता ते सर्वोच्च न्यायालयात सात बेंचच्या समोर गेले पाहिजे, ही उद्धव ठाकरे यांनी केलेली मागणी योग्य आहे. यामध्ये निवडणूक आयोग हस्तक्षेप करीत आहे, हे योग्य नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले
कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक नागपुरात सुरू झाली . बैठकीला जाण्यापूर्वी नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रातील ईडी सरकार (एकनाथ शिं दे आणि देवेंद्र फडणवीस) ही राज्याची तिजोरी लुटण्यासाठी आणि त्यांच्या मौज मस्तीसाठी बनलेली आहे. मंत्रिमंडळातला एक मंत्री सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री आहे. असा टोला देवेंद्र फडणवीसांचे नाव न घेता नानांनी लगावला. ते म्हणाले, हे संभव होऊ शकत नाही. पालकमंत्र्यांनी दर महिन्याला जिल्ह्यात जाऊन बैठक घेतली पाहिजे, लोकांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, त्या सोडवल्या पाहिजेत. पण असे होताना दिसत नाही. एक मंत्री दर महिन्याला ६ जिल्ह्यात जाणे शक्यच नाही. तरीही त्यांनी सहा-सहा जिल्हे आपल्याकडे ठेवले, हे न समजण्यासारखे आहे. जनतेमध्ये राज्य सरकारचा निषेध केला जात आहे.
जर सरकारमध्ये सहभागी असलेले काही लोक अपात्र ठरले, तर मग सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच पुढे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने आपली कार्यवाही थांबवली पाहिजे. राज्य सरकार लोकशाहीच्या परंपरेला हरताळ फासत आहे. या सरकारमधील पालकमंत्री त्यांच्या जिल्ह्यांवर अन्याय करीत आहे. जनतेचे खूप प्रश्न आहे. त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे बरेच प्रश्न आहे. पण सरकारचे याकडे अजिबात लक्ष नाही. या सरकारमधील लोक पूर्ण वेळ राजकारण करण्यात लागलेले आहेत. त्यामुळे राज्याची अधोगती होत आहे, असे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले बारामतीत अन् जिल्ह्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने घेतली फडणवीसांची भेट
ज्या समृद्धी महामार्गाच्या कामाचा बडेजाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली, त्या रस्त्यावर १००पेक्षा जास्त अपघात झाले. अनेकांनी त्यामध्ये जीव गमावला. खरं तर हा श्रीमंतांसाठी बनलेला रस्ता आहे. गरीब आणि मध्यमवर्गायांसाठी हा रस्ता नाही. जे अपघात झाले, त्यामध्ये लहान गाड्यांचा समावेश आहे. या रस्त्यासाठी घेतलेले हजारो कोटी रुपयांचे कर्ज आता गरिबांच्या खिशातून लुटून फेडण्याचा घाट घातला गेला आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply