राजकारणानेच प्रगती होते असा विचार करणे चुकीचे – नितीन गडकरी

नागपूर : ९ जानेवारी – कुठल्याही समाजाने कोणत्या नेत्यामागे उभे राहावे हा त्या-त्या समाजाचा अधिकार आहे. मात्र, आपल्या समाजाचा आमदार निवडला की विकास होईल असे कुणाला वाटत असेल तर त्याला अर्थ नाही. एखाद्या समाजाची व्यक्ती आमदार झाली तर त्या समाजाचीही प्रगती झाली असे आजपर्यंत तरी पहायला मिळाले नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, समाजाचा आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक विकास करणे आवश्यक आहे. परमेश्वर व सरकारवर विश्वास ठेवायला हरकत नाही पण आजचा काळ आपणच आपला विचार करण्याचा आहे. तुम्ही कोणाला मत दिले याने काही फरक पडणार नाही. ज्याच्यात दम आहे तो निवडून येईल. पण राजकारणानेच प्रगती होते असा विचार करणे चुकीचे आहे. एखाद्या समाजातील राजकीय नेत्यामुळे कोणाची प्रगती झाली असे वाटत नाही, असेही गडकरी म्हणाले.
हलबा समाजाचा हातमागाचा व्यवसाय होता, चांगले काम सुरू होते. मात्र कालांतराने नवीन योजना आल्या. त्यांनी पारंपरिक कलेला समाप्त केले. जनता साडी, धोती योजना आली आणि हातमाग कला संपली. असे घडत असते. आपण आता पाचगावात एक युनिट सुरू केले, त्यात बाराशे महिला काम करतात. लवकरच बेला आणि धापेवाडय़ाला युनिट सुरू करणार आहोत.

Leave a Reply