अमित शाह पुजाऱ्याची जबाबदारीही घेत आहेत – शरद पवारांचा टोला

कोल्हापूर : ८ जानेवारी – केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम मंदिर १ जानेवारी २०२४ रोजी बांधून पूर्ण झालेलं असेल, अशी घोषणा केली. यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनीही या मुद्द्यावर “अमित शाह पुजाऱ्याची जबाबदारीही घेत आहेत,” अशी प्रतिक्रिया देत अमित शाहांना टोला लगावला. ते रविवारी (८ जानेवारी) कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “राम मंदिर बांधून कधी पूर्ण होणार हा देशाच्या गृहमंत्र्याचा विषय आहे की नाही मला माहिती नाही. ही माहिती राम मंदिराच्या पुजाऱ्याने दिली असती, तर ही चांगली गोष्ट झाली असती. मात्र, अमित शाह पुजाऱ्याची जबाबदारीही घेत आहेत. हरकत नाही.”
“लोकांच्या प्रमुख प्रश्नांवर लक्ष जाऊ नये, जनतेचं लक्ष विचलित करावं यासाठी राम मंदिर किंवा त्यासारखे विषय काढले जात आहेत,” असा आरोप शरद पवारांनी केला.
शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारींच्या या वक्तव्यावर एका वाक्यात मिश्किल टिपण्णी केली. शरद पवार म्हणाले, “ते दुःखी असतील, तर आम्हीही सगळे दुःखीच आहोत.” राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर बोलताना शरद पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्राची एक परंपरा आहे. या राज्यात लोकांनी अनेक चांगले राज्यपाल पाहिले आहेत. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासारखे अनेक नावं यात घेता येतील. अतिशय उच्च दर्जाचे व्यवहार असणारे लोक महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून मिळाले.”
“महाराष्ट्रात जे जे राज्यपाल झाले त्यांनी पक्ष कोणताही असो, पण राज्याच्या हितासाठी मार्गदर्शन केले आणि घटना आबाधित ठेवली. हे पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्याबद्दल सतत चर्चा होते. त्यांच्यावर लोकांना सतत टीका करावी लागते,” अशी टीका शरद पवार यांनी केली.
“ते सतत चुकीची वक्तव्ये करतात. त्यामुळे जनतेला त्यांची नापसंती दाखवावी लागते. हे चांगलं नाही. शेवटी हे महत्त्वाचं पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, पण भगतसिंह कोश्यारींकडून राज्यपालपदाची प्रतिष्ठा राखली जात नाही,” असा आरोप शरद पवार यांनी केला.

Leave a Reply