दिल्ली ते जम्मू काश्मीर जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

नवी दिल्ली : ६ जानेवारी – राजधानी नवी दिल्लीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता मोठी असल्यानं जम्मू काश्मीरपर्यंत याचा प्रभाव जाणवला. दिल्लीतील नागरिकांनी देखील भूकंपाची तीव्रता अनुभवली. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ५.८ इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानमध्ये असल्याची माहिती आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कसलिही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. मात्र, लोकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं दिसून आलं आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.
नवी दिल्ली भूंकपाच्या दृष्टीनं संवेदनशील भागात येते. दिल्लीसारख्या ठिकाणी जादा तीव्रतेचा भूकंप आल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे. दिल्लीत जादा तीव्रतेचा भूकंप झाल्यास किती हानी होऊ शकते याची कल्पना देखील अशक्य आहे,त्यामुळं दिल्लीत भूकंप झाल्यास लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी देशात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले होते. १ जानेवारी रात्री उशिरा ११.२८ मिनिटांनी मेघालयच्या नोंगपोहमध्ये ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यावेळी भूकंपाचं केंद्र नोंगपोहमध्ये जमीनीत १० किमी अंतरावर होतं. उत्तराखंडमधील उत्तरकाशी ते नापळपर्यंत २७-२८ डिसेंबरला भूकंप झाला होता. त्या बूकंपाचं केंद्र नेपाळच्या बागलुंग जिल्ह्यात होतं. खुंगाजवळ दुसऱ्या भूकंपाचा धक्का बसला होता. त्याची क्षमता ५.३ रिश्टर स्केल इतकी होती.

Leave a Reply