संजय राऊत यांची भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका

मुंबई : ३ जानेवारी – शिंदे गट हा मांडलिक आहे. त्यांना स्वत:चं वेगळं असं अस्तित्त्व नाही. त्यामुळे शिंदे गट ही फक्त एक टोळी झाली आहे. अशा टोळ्या फार काळ टिकत नाहीत. एकतर त्या गँगवॉरमध्ये मारल्या जातात, नाहीतर पोलीस एन्काऊंटरमध्ये, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. टोळ्यांचे अस्तित्त्व फार काळ राहत नाही. ही टोळी जितके काळ सत्तेवर आहे, तितके दिवस खंडण्या गोळा करायचं काम करेल, असेही त्यांनी म्हटले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी संजय राऊत यांना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली.
शिंदे गट हा आता भाजपला समर्पित आहे, तो कधीही त्यांच्यात विलीन होऊ शकतो. शिंदे गटाच्या आमदार आणि नेत्यांमधील शिवसैनिक मेला आहे, त्यांच्यातील स्वाभिमान संपला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या मुद्द्यावरुन अजित पवार यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपला फटकारले. देशातील इतर राज्यांना केवळ भुगोल आहे, पण महाराष्ट्राला इतिहास आहे. हा इतिहास राज्यपालांना मान्य नाही. अशा राज्यपालांना हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यावर भाजपने प्रथम बोलावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
तसेच संजय राऊत यांनी गुजरातमुळे महाराष्ट्रातील बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचा दावा केला. महाराष्ट्रात सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे. कारण अनेक बडे उद्योग दुसऱ्या राज्यात गेले आहेत. जे उद्योग एकावेळी एक ते दीड लाख रोजगार देऊ शकत होते, ते गुजरातने पळवले म्हणून महाराष्ट्रातील बेरोजगारीचा टक्का वाढला, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Leave a Reply